
राष्ट्रवादीवर नाराज बाबा कांबळे यांचा भाजपाला जाहीर पाठिंबा!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावर मोठी आणि निर्णायक घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकरल्याने कष्टकरी, रिक्षा चालक व असंघटित कामगारांचे बुलंद नेतृत्व म्हणून ओळख असलेले डॉ. बाबा कांबळे यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा देत आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी २०२६ च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
पिंपरी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना डॉ. बाबा कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “कष्टकऱ्यांचे स्वतंत्र आणि लढाऊ नेतृत्व अजित पवारांना नको आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. आम्ही 25 वर्षे राष्ट्रवादीला साथ दिली. मात्र, आम्हाला प्रतिनिधीत्व दिले नाही. आता राज्यातील 29 महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार आहोत, असा इशाराही बाबा कांबळे यांनी दिला आहे.
डॉ. कांबळे म्हणाले की, कष्टकरी, रिक्षा चालक आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत असताना जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या गेल्या. एका टप्प्यावर “प्रस्थापित नेत्याच्या मुलासाठी” आपला राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला आणि सर्व बाजूंनी कोंडी करण्यात आली. अशा कठीण काळात आमदार महेश लांडगे यांनीच खऱ्या अर्थाने मदतीचा हात पुढे केला, असे त्यांनी स्पष्ट केले.
याच सभेत डॉ. बाबा कांबळे यांनी मोठे राजकीय आवाहन करत सांगितले की, “पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ७ लाख रिक्षा चालक आणि कष्टकरी संघटनांचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला मतदान करणार नाहीत,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. हे आवाहन शहराच्या राजकारणात मोठा परिणाम घडवू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
हेदेखील वाचा : “नामांतरानंतर पहिला महापौर भाजपा–राष्ट्रवादी युतीचा करा; 1 महिन्यात ‘हा’ प्रस्ताव मंजूर होईल,” मुख्यमंत्र्यांचे आवाहन
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरूवारी पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा होता. या दौऱ्यामध्ये बाबा कांबळे यांच्याशी संवाद असा दुपारी कार्यक्रम नियोजित होता. मात्र, कांबळे यांनी थेट भाजपाचे व्यासपीठ गाठले आणि भाजपाला पाठिंबा दिला. शहरात स्थानिक नेतृत्त एक होत आहे, याचे हे संकेत मानले जात आहेत.
आम्ही कितीही अडचणीत आलो तरी मागे हटणार नाही
“कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही कितीही अडचणीत आलो तरी मागे हटणार नाही. जेव्हा नेता खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो, तेव्हा त्याच्यासोबत आम्ही ठामपणे उभे राहतो. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक रिक्षाचालक, कामगार आणि असंघटित कामगार यांचा आवाज ऐकला जाईल, त्यांच्या समस्यांसाठी आम्ही लढू आणि न्याय मिळवून देऊ. राजकारण आमच्या सत्तेसाठी नाही, तर कष्टकऱ्यांच्या सन्मान, सुरक्षा आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी आहे.”
– डॉ. बाबा कांबळे, कामगार नेते