आप खासदार संजय सिंह यांचा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये कोणाचे सरकार तयार होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. जनता पुन्हा एकदा महायुतीला पाठिंबा देणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याची उत्सुकता लागली आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी राहिल्यामुळे जोरदार प्रचार सभा व दौरे केले जात आहेत. आता नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या देखील अनेक सभा होत आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये आम आदमी पक्ष भाग घेत आहे. पण प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आप उमेदवार देणार नाही याची घोषणा करण्यात आली होती. आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल हे प्रचारासाठी येणार आहेत. त्यापूर्वी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी नागपुरात सभा घेत महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. दोन लाख कोटींची गुंतवणूक असलेले प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आले असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा घणाघात संजय सिंह यांनी केला.
राजकीय बातम्या : ८४ वर्षांच्या शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा
काय म्हणाले संजय सिंह?
बुटीबोरी आणि मिहानमध्ये प्रस्तावित दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. वेदांता-फॉक्सकॉनचा सेमिकंडक्टर्सचा आणि टाटा-एअरबस’ असे अनेक कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे मोठे प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेले आहेत. यावरुन राजकारण रंगलेले असताना आप खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर व महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात येऊ घातलेले २ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये त्यांनी पळवले. हा महाराष्ट्रातील जनतेसाठी, मराठी माणसाकरिता सर्वांत मोठा मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक दिली. येथील जनता केंद्रातील भाजप सरकारविरोधात आक्रोषित असून महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने विजयी होईल,” असा विश्वास आप खासदार संजय सिंह यांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे नेते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं असा नारा दिला. यावरुन महायुतीचे राजकारण व प्रचार सुरु आहे. यासाठी काही अंतर्गत नेत्यांनी विरोध केला आहे. यावर आप खासदार संजय सिंह म्हणाले की, “ज्या प्रकारे भाजपच्या नेत्यांकडून प्रचारात द्वेषाची भाषा वापरली जात आहे. त्याला महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून उत्तर देईल. ‘ना बटीए, ना कटीए, मिलकर बीजेपी को रपटीए’,” अशी घोषणा आप नेते व खासदार संजय सिंह यांनी दिली आहे.