heatwave
अकोला : गेल्या काही दिवसांपासून हवामानात (Weather News) कमालीचा फरक जाणवत आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाचा कडाका हे दिसत आहे. त्यातच आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. तरीदेखील महाराष्ट्रातील भाग असलेला विदर्भ अद्याप तापलेलाच आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथील उष्णतेचा पारा पुन्हा 47 अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे विदर्भवासियांच्या अंगाची पुरती लाहीलाही होत आहे.
सध्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट दिसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान तुलनेने कमी होते. तर एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे काही दिवस विदर्भ गारठला होता. मात्र, त्यावेळी मध्य महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने अक्षरश: तापला होता. अहमदनगर, सातारा, सोलापूर, मालेगाव, जळगावसह सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानाने उच्चांक गाठला होता.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. विदर्भ झपाट्याने तापू लागला. मागील तीन आठवड्यापासून विदर्भ चांगलाच तापला असून, सलग तिसऱ्यांचा येथील कमाल तापमान 47 अंशावर जावून पोहचले आहे.