
धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकलं पाहिजे; सुप्रिया सुळे संतापल्या
परळीतील सभेत धनंजय मुंडेंनी आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याबाबत विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या, ज्या व्यक्तींनी कोणाच्या तरी वडिलांची क्रूर हत्या केली, अशा लोकांची आठवण एखाद्या नेत्याला होत असेल, तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. तसेच अशा प्रवृत्तींचे समर्थन करणारे नेते कोणत्याही पक्षातील असोत, त्यांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे, अशा विधानांनी महाराष्ट्राच्या ऐक्यास बाधा पोहोचते, असा संताप सुळे यांनी व्यक्त केला आहे.
प्रीतिसंगमावरील समाधीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन
यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अभिवादनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ते कामात व्यस्त असतील, याबाबत माहिती नाही. परंतु प्रशासन मात्र वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा पाळण्यास बांधील आहे. यावेळी प्रशासनाकडून झालेली चूक प्रकर्षाने जाणवते.
टीका करणारे आधी कोणत्या पक्षात होते, हे त्यांनाच आठवत नाही
साताऱ्यात भाजपकडून उमेदवार ‘आयात’ करावा लागला, या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, टीका करणारे आधी कोणत्या पक्षात होते, हे त्यांनाच आठवत नाही. त्यांचा मूळ पक्ष मलाही नीट आठवत नाही, अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनीही या पार्श्वभूमीवर विधान करत म्हटले, दोन्ही राजांच्या भूमिकेबद्दल मी बोलत नाही. पण एक महिला सक्षमपणे उभी असून, त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यामुळे जनताच योग्य कोण ते ठरवेल, असे मत व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही
सुळे म्हणाल्या, हिमालय अडचणीत असताना सह्याद्री धावून गेला होता. देशाचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही. परंतु त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे प्रशासनाने यावर्षी केलेले दुर्लक्ष अत्यंत दुर्दैवी आहे. त्या पुढे म्हणाल्या, या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. सरकारे येतात-जातात, पण काही परंपरा पाळायलाच हव्यात. चव्हाण साहेबांचा योग्य मानसन्मान राखणे ही राज्याची जबाबदारी आहे.