
पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनाव होणार गायब; बीडच्या 'त्या' निर्णयाचे इतर जिल्हा पोलिसांकडूनही स्वागत...
छत्रपती संभाजीनगर : पोलिस म्हटलं तर खाकी वर्दी आणि त्या वर्दीवर असलेली त्यांच्या नावाची पट्टी हे सर्वसामान्य आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांच्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याच्या निर्णयाने राज्यभरात चर्चेचे वारे उठले होते. आता या निर्णयाचे अनुकरण छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलातही होत आहे. काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवले असून, या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.
बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या जातीवर आधारित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पोलिस विभागातही जातीय नियुक्त्यांबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील तसेच कार्यालयीन नावपट्टांवरील आडनावे हटवण्याचे निर्देश दिले. हा निर्णय जातीय ओळख मिटवून पोलिस दलात समानता आणि निष्पक्षता वाढविण्याच्या उद्देशाने घेतला गेला.
राज्यभरात या पावलाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले, तर काहींनी केवळ आडनाव हटवून जातीयवाद संपेल का? असा प्रश्न उपस्थित केला.
नावाच्या पट्टीवर केवळ नावाचा उल्लेख
नावपट्टीवरील आडनावावरून एखाद्या व्यक्तीची जात वा धर्म सहज ओळखता येतो. त्यामुळे आपला -परका असा भेदभाव निर्माण होण्याची शक्यता वाढते, अशी मते कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. काहींच्या मते, नियुक्ती आणि बदली प्रक्रियेत अशा ओळखीचा सूक्ष्म प्रभाव पडतो. त्यामुळे आडनावविरहित नावपट्टीचा प्रसार झाला, तर तो दलातील एकजूट आणि निष्पक्षता वाढविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल ठरेल, आपण आपल्या पसंतीने नावपट्टीवरील आडनाव हटवले आहे. आपल्यापुरते आपण पालन करतो आहोत, असे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Yavatmal City News :- पांढरकवडा आणि उमरखेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई- विनापरवाना रेती वाहून नेणारे पकडले पाच आरोपींना अटक