धाराशिव: ‘मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात,’ असे विधान राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली असतानात आता तानाजी सावंतांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात थेट शेतकऱ्याची लायकी काढल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. धाराशिवमध्ये बंधाऱ्याचा प्रश्न मांडणाऱ्या शेतकऱ्याची लायकी मंत्री सावंत यांनी काढल्याने तानाजी सावंताच्या विरोधात संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत शुक्रवारी (30ऑगस्ट) धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. याठिकाणी त्यांनी वाशी, पारा, पिंपळगाव इत्यागी गावांचा संवाद केला. या दौऱ्याच्या पिंपळगाव (को) येथे गणपती मंदिर परिसरातील एका सभागृहात मंत्री सावंत विकास कामांबद्दल माहिती देत होते. यावेळी शेतकरी श्रीधर कुरुंद यांनी बंधाऱ्याच्या दरवाज्या संबंधित प्रश्न उपस्थित केला.
हेदेखील वाचा: नागपूर पूर्व मतदारसंघ: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची पकड; कशी आहेत राजकीय समीकरणे?
‘बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली असून आपण ती दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी कुरुंद यांनी केली. त्यावर 10 सप्टेंबरपर्यंत बंधाऱ्याला दरवाजे बसवून घेऊ, असे तानाजी सावंतानी स्पष्ट केले. पण बंधाऱ्याला आता दरवाजे बसवले तरी नंतर पाण्याचा प्रवाग वाढल्यास दरवाजाच्याबाजूने पाणी वाहून जाऊ शकते, त्यामुळे बंधाऱ्याची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे शेतकरी कुरूंद यांनी निदर्शनास आणून दिले. पण त्यावर शेतकऱ्याचे समाधानकारक उत्तर देण्याऐवजी तानाजी सावंत चांगलेच भडकले.
शेतकऱ्याला उद्देशून तानाजी सावंत म्हणाले, खाली बसा, मी स्वत:इंजिनीअर आहे. तुमचं समाधान झालं म्हणजे झालं ना, गेल्या10 वर्षात तुम्ही काही बोलले नाही आणि आज बोलताय. आपण इथे विकासाचं बोलण्यासाठी आलो आहे. कोणाचीतरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नका.
हेदेखील वाचा: Ganesh Chaturthi: गणेशोत्सवात बाप्पाचे स्वागत करा गोड पदार्थांनी, झटपट बनवा बेसन बर्फी
रस्त्यावर पाठिभर मुरुम कोणी टाकला ते तुम्ही पाहिलं नाही. 35 वर्ष फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं गेलं, आम्ही त्यासाठी 16 हजार कोटी खर्च केले, आता 95 टक्के पाणी शेतजमिनीत पाणीपुरवठा होत आहे. उगाच कोणाची तरी सुपारी घेऊन बोलायचं नाही. लायकीत राहून बोलायचं. ऐकून घेतो म्हणून काहीही बोलायचं नाही.” अशा शब्दांत तानाजी सावंतांनी अक्षरश: शेतकऱ्यावर सुनावलं.
तानाजी सावंतांचा पारा चढलेला पाहून उपस्थित पोलिसांनीही श्रीधर कुरुंद यांना बाजूला घेऊन गेले. पण तानाजी सावंतांच्या या कृतीमुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बसल्याने आम्हाला उलटी होते, असे विधान करून अवघे काही तास उलटत नाहीत तोच त्यांच्या या विधानाचीही राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. आमदार बच्चू कडू आणि आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या विधानावरून टीका केली आहे.
हेदेखील वाचा: अजित पवार झालेत महायुतीला जड? काल मंत्री तर आज प्रवक्त्यांकडून नाराजीचा सूर