फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. अजित पवार गटासह विविध घटक पक्षांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. महायुतीने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीची रणनीती तयार केली आहे. लोकसभेमध्ये मोठा फटका बसला असल्यामुळे विधानसभेची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये अजित पवार जड झाले आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगून देखील भाजप आणि शिंदे गटाचे नेते अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये सामील होऊन अजित पवार यांच्याकडून नेमकं चुकलं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाहेर आल्यानंतर उलट्या होतात
त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणूका आहेत. त्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी आणि कलह समोर आला आहे. काल (दि.30) शिंदे गटाचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्यासोबत बसल्यावर उलट्या होतात, असे विधान केले. मंत्री सावंत म्हणाले, ”मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही माझं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जमले नाही. अगदी शिक्षण घेत असल्यापासून यांच्याशी कधी जमले नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही”, असे धक्कादायक विधान केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी युतीमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज तानाजी सावंत यांना भेटायला देखील बोलावले आहे.
असंगशी संग म्हणतात असा युती
यानंतर आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवार यांच्यासोबतची युती असंगाशी संग अशी असल्याची टीका केली. गणेश हाके म्हणाले, “भाजपचे अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडलेच नाहीत. यामुळे भाजपाच्या खासदाराचा पराभव झाल्याचे गणेश हाके म्हणाले. त्यामुळं अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग आमच्यासोबत घडवला आहे,” असा घणाघात भाजप प्रवक्त्यांनी केल्यामुळे अजित पवार गट नाराज झाला आहे.
अजित पवार यांचं चुकलं तरी काय?
दोन वर्षांपूर्वी शिंदे गट व भाजप यांच्यामध्ये युती झाली. हिंदूत्व आणि बहुमत या मुद्द्यावरुन ही महायुती तयार झाली. मात्र राष्ट्रवादी पक्षातील वादामुळे अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला. पक्षातील आमदारांसह ते महायुतीमध्ये सामील झाले. पुरोगामी विचारांचा पक्ष असलेला राष्ट्रावादी भाजपसोबत युती करत असल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. शिवसेनेमध्ये बंड केल्यावर शिंदे गटाने राष्ट्रवादीसोबत केलेली युती आणि अजित पवार निधी देत नसल्याची आरोळी उठवली होती. मात्र अजित पवार पुन्हा महायुतीमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांची गोची झाली. अगदी तेव्हापासून अनेक शिंदे गटाचे व भाजपचे नेते नाराज आहेत. लोकसभा निवडणूकीमध्ये अजित पवार यांना बारामतीचा गड न राखता आल्यामुळे देखील टीका करण्यात आली.
लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला राज्यामध्ये अपेक्षित असे यश आले नाही. महायुती म्हणून पहिल्यांदाच हे तिन्ही पक्ष एकत्रित लढत होते. मात्र त्यांना मोठा फटका बसला. याचं खापर अनेकांनी अजित पवार यांच्याच माथी मारले. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील अजित पवार यांच्या युतीमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरएसएसने थेट लेखामध्ये अजित पवार यांना सामली नव्हते करुन घेतले पाहिजे, असे मत नोंदवल्यामुळे शिंदे गट, भाजप व आरएसएसला देखील अजित पवार जड वाटत आहेत का? असे चित्र निर्माण झाले.