
Thackeray Brothers Interview, Teaser viral
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या आगामी मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या स्फोटक टीझरमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवादाचे महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीझरमध्ये संजय राऊत ठाकरे बंधूंना उद्देशून, “एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला २० वर्षे वाट का पाहावी लागली?” असा थेट सवाल करताना दिसत आहेत. यावर राज ठाकरे यांनी, “मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी काही शक्तींचे प्रयत्न सुरू आहेत,” असा गंभीर दावा केला आहे. त्याचवेळी “मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करूच नयेत,” असा इशारा त्यांनी दिल्याचे दिसून येते. ठाकरे बंधूंच्या या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध होणार असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवे संकेत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या टीझरमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चर्चा आणि प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ड्रग्ज सापडल्याचा आरोप करणार प्रश्न या टीझरमध्ये करण्यात आला आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीसह शहरातील अनेक मूलभूत समस्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी खरं सांगतो, मुंबईकर म्हणून मला आता घराबाहेर पडताना लाज वाटते,” असे परखड मत मांजरेकर यांनी मांडले. केवळ दहा मिनिटांच्या अंतरासाठी आता तब्बल एक तास लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी मुंबईच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधले. “मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, मात्र पुण्यात असे होणार नाही. पुणे लवकरात लवकर बरबाद होईल,” असा सावध इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्या ठिकाणी मतदार बोटावर शाई कशी दाखवणार, असा सवाल महेश मांजरेकर यांनी उपस्थित केला. यावर ठाकरे बंधूंनीही टीझरमध्ये टीका करत, वाटलेल्या नोटांमुळेच हे सर्व घडले, असा आरोप केल्याचे दिसून येते. या टीझरमुळे आगामी मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, संपूर्ण मुलाखतीतून आणखी कोणते स्फोटक खुलासे समोर येतात, याची उत्सुकता वाढली आहे.
राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे सत्तेवर असता कामा नये! ऐतिहासिक महामुलाखत… संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेली दणदणीत आणि खणखणीत मुलाखत उद्यापासून… भाग १ गुरुवारी ८ जानेवारी रोजी फक्त सामनावर @rautsanjay61 @OfficeofUT @RajThackeray pic.twitter.com/rHCvVwlvyT — Saamana Online (@SaamanaOnline) January 7, 2026