मीरा-भाईंदर / विजय काते: हिंदी मराठी वाद राज्यात शिगेला पोहोचला आहे. मराठी आणि अमराठी या संघर्षातआता ठाकरे गटाने महात्वाचं पाऊल उचललं आहे. मीरा-भाईंदर शहरात मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने एक सामाजिक आणि भाषिक सलोखा वाढवणारा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील पेणकरपाडा येथील प्रेमा लक्ष्मण विद्यालयात ठाकरे गटाच्यावतीने मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आला असून, शेकडो अमराठी नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
या मराठी वर्गात अमराठी बांधवांना मराठी बाराखडी, साधे संवाद, शिष्टाचार भाषाशैली आणि मराठी सण, संस्कृती यांची प्राथमिक माहिती दिली जात आहे. यामध्ये महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि लहान व्यावसायिकांपासून स्थानिक कामगारांपर्यंत विविध घटकांचा समावेश आहे.
भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर शांतीचा संदेश
गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदरमध्ये मराठी-हिंदी भाषिकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि सामाजिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर, या उपक्रमामुळे शहरात भाषिक सलोख्याची नवी चळवळ सुरू झाली आहे.
मराठी शिकून इतर भाषिकांनी मराठी माणसाशी संवाद साधावा, हीच या उपक्रमामागची भूमिका आहे, असे आयोजकांनी सांगितले.
ठाकरे गटाची भूमिका ठळक
या उपक्रमात ठाकरे गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि मराठी संघटनांचे स्वयंसेवक पुढाकार घेत असून, प्रत्येक शाखेमध्ये असे मराठी वर्ग सुरू करण्याची योजना असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
“महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान नको; मराठी ही फक्त भाषा नाही, ती संस्कृती आणि अस्मिता आहे,” असे सांगत ठाकरे गटाने मराठी प्रसाराच्या मोहिमेस सुरुवात केली आहे.
उद्याच्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे लक्ष
उद्याच्याच दिवशी मराठी प्रेमींसाठी एक मोठा मराठी अभिमान मोर्चा शहरात निघणार असून, या पार्श्वभूमीवर हा शिकवणी वर्ग अधिकच लक्षवेधी ठरला आहे.
मराठीप्रेमी जनतेने या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले असून, अनेकांनी सोशल मिडियावरून त्याला पाठिंबा दर्शवला आहे.पेणकरपाडा येथून सुरू झालेली ही मराठी शिकवणी चळवळ, केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता, मीरा भाईंदर शहरात भाषिक समरसता, सामाजिक ऐक्य आणि मराठीचा अभिमान जागवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.”मराठी माणूस एकवटला, तर बदल घडतो,” हेच या उपक्रमातून स्पष्ट होत आहे.