Nashik News
Nashik News: नाशिकच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऐन दिवाळीमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठा धक्का दिला आहे. भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. खास बाब म्हणजे, या नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्तेही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर होत असलेला पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठी गळती लागल्यानंतर पहिल्यांदाच पक्षात इनकमिंग झाल्याने ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे. माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि माजी नगरसेवक हेमंत गायकवाड यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे पक्ष मजबूत होणार असून, या निर्णयामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्यांच्या पाठोपाठ आणखी काही स्थानिक नेते व कार्यकर्ते ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंगला वेग आला आहे. भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरू असतानाच, ठाकरे गटात होत असलेली ही इनकमिंग त्यांच्या उत्साहवर्धक मानली जात आहे. अलीकडेच मनमाड शहरातील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले होते. त्यामुळे नाशिकमधील या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी निवडणुकीपूर्वी सुरू असलेली ही राजकीय हालचाल स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण करण्याची शक्यता दर्शवते.