ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली आहे. तर, प्रदेशाध्यक्षपदी भिवंडी महानगर पालिकेचे सभागृह नेते विकास निकम यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी ठाण्यात पार पडली. या बैठकीस राहुल मून, डाॅ. भार्गव, भैय्यासाहेब इंदिसे, जितेंद्रकुमार इंदिसे यांच्यासह देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला असल्याने दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष दौलतराम यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास सर्वांनीच एकमताने मंजुरी दिली. तर, प्रदेशाध्यक्षपदासाठी अहिल्यनगरचे अध्यक्ष गौतम विघे यांनी विकास निकम यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावासही राज्यातील कार्यकर्त्यांनी एकमताने मान्यता दिली.
या निवडीनंतर बोलताना नानासाहेब इंदिसे म्हणाले की, संविधानिक पद्धतीने आपली राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी रिपाई एकतावादी गेले अनेक वर्ष काम करीत आहे. आता संविधानाची लढाई पक्ष लढणार आहे. ईव्हीएम, पॅनल पद्धती या लोकशाहीसाठी मारक आहेत. लोकशाहीमध्ये मतदाराला आपले मत कुठे गेले आहे, हे समजलेच पाहिजे मात्र, तसे होत नाही.
पॅनल पद्धती राबवून संविधानाने दिलेल्या एक निवडणूक एक मत या तत्वाला हरताळ फासून प्रस्थापित स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. म्हणूनच आम्ही त्यास विरोध करीत आहोत, असे सांगितले. तर, येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत रिपाई एकतावादी मोठ्या ताकदीने उतरणार आहे. सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. समविचारी पक्षांसोबत तसेच स्वबळावर रिपाई एकतावादी निवडणूक लढवेल, असे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी सांगितले आहे.