संग्रहित फोटो
मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. काँग्रेस पक्ष बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून, छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.
प्रदेश काँग्रेसच्या रोजगार विभागाचे संयोजक व प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, “राज्य विद्युत महामंडळाच्या महावितरण, महापारेषण व इतर विभागांमध्ये शेकडो जागा रिक्त आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही पदे भरली जात नाहीत. रोजगार सत्याग्रह यात्रेतून आम्ही सरकारला कठोर इशारा देत आहोत, भरती प्रक्रिया सुरू करा, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर तसेच विधानसभेतही याविरोधात आवाज उठवेल. तरुणांचे रोजगार हक्क अबाधित राखण्यासाठी रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९:०० वाजता क्रांती चौक येथून या यात्रेला प्रारंभ होऊन MSEB चे सह-व्यवस्थापकीय संचालक कार्यालय, मिल कॉर्नर येथे पोहोचेल. तेथे निवेदन सादर केल्यानंतर दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करणार आहे.
मागण्या काय आहेत?
सरकारने महावितरण, महामार्ग व महानगरपालिका विभागांतील ITI, डिप्लोमा व अभियांत्रिकी शिक्षणावर आधारित सर्व रिक्त पदांची तातडीने भरती करावी.
विभागातील सर्व रिक्त पदे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन भरावीत.
महावितरण व महामार्ग विभागांतील कंत्राटी सेवेची मुदत ३ वर्षांवरून १ वर्षावर आणावी.
दरवर्षी होणारी पदविका परीक्षा नियमित भरती प्रक्रियेत समाविष्ट करावी.
कोणत्याही कारणास्तव नोकरीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना “आउट ऑफ टर्न” नियुक्तीची संधी द्यावी.
सहाय्यक अभियंता पदासाठीची GATE परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करावी.
कनिष्ठ अभियंता पदासाठीची कमाल वयोमर्यादा वाढवावी.
या मागण्यांसाठी हा सत्याग्रह आहे. या रोजगार यात्रेत मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच NSUI, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व अन्य संलग्न विभागाचे कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अशी माहिती, धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दिली.