ठाण्यात रक्षाबंधनाच्या दिवशीच लाडक्या बहिणीच्या घरी चोरी, ९ लाख ६३ हजार किंमतीचे दागिने गायब
रक्षाबंधनासारख्या पवित्र आणि कुटुंबीयांच्या एकत्र येण्याच्या सणाच्या दिवशी ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. ठाण्यातील कापडी चाळ भागातील एका घरावर चोरट्यांनी धाड टाकून लाखो रुपयांचे सोनं, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. ही घटना सुदेश चंद्रकांत कापडी यांच्या घरात घडली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, ९ ऑगस्ट शनिवार रोजी सुदेश कापडी आणि त्यांचे कुटुंबीय रक्षाबंधनाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे गेले होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता ते घरी परतले असता त्यांना हॉल आणि बेडरूम पूर्णपणे अस्तव्यस्त अवस्थेत आढळले. घराच्या लोखंडी सेफ्टी डोअरचा कोयंडा तुटलेला होता, कपाटे उघडी पडली होती आणि घरातील लॉकर रिकामे होते. देवघरातील चांदीच्या देवांच्या मुर्त्या जमिनीवर पडलेल्या दिसल्या, ज्यावरून चोरट्यांनी घरात प्रवेश करून सर्वत्र उधळण केल्याचे स्पष्ट झाले.
तपासात उघड झाले की चोरट्यांनी घरातून सोनं, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ₹९,६३,६०० किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. कुटुंबीयांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि नियोजित पद्धतीने चोरी केली.
या घटनेनंतर सुदेश कापडी यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विशेष तपास पथक नेमले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.
या घटनेमुळे ठाणेकरांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणीच्या घरावरच चोरट्यांनी धाड टाकल्याने, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. काहींनी थेट सवाल उपस्थित केला आहे की, “शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीला न्याय मिळेल का?” तसेच, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली आहे. सणासुदीच्या काळात पोलिसांनी गस्त आणि सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जर अशा प्रभावशाली व्यक्तींच्या कुटुंबीयांवरही गुन्हेगारांचा हात पोहोचत असेल, तर सामान्य नागरिकांची स्थिती किती असुरक्षित आहे, याचा अंदाज यावरून येतो.
या घटनेनंतर ठाणे पोलिसांवर गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचे दबाव वाढले आहेत.