अंबरनाथमध्ये अग्नीतांडव; रासायनिक कंपनीत उडाला आगीचा भडका
अंबरनाथ/ दर्शन सोनावणे: अंबरनाथ पूर्वेच्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये कंपनीत आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रसिनो ड्रग्ज प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीला रविवारी रात्री भीषण आग लागल्याने परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास कंपनीत आग लागल्य़ाची दुर्घटना घडली. यादरम्यान कंपनीत ज्वलनशील रसायनाचे ड्रम, टाक्या असल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता. कर्मचाऱ्यांनी प्रसंगाधान राखल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीतील काही कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कंपनीतील कर्मचारी कामावर असताना देखील ही आग लागलीच कशी, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही. ही आग लागली कि लावण्यात आली याचा पोलिस तपास घेत आहेत. आगीची तीव्रता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, शेजारील कंपन्यांना देखील आगीची झळ बसली. कंपनीतील रसायन रस्त्यावर वाहत असताना रस्त्यावर आगीच्या ज्वाला पसरल्या होत्या. रसायन ज्वलनशील असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले. मात्र या अग्नीतांडवात रसिनो ड्रग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा –पुण्यातील ‘या’ भागात गॅस टँकर पलटी; वाहनांच्या लांबच लांब रांगा
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दालासह अंबरनाथ, बदलापुर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली येथील अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . आगीचे मोठं मोठे स्फोट होत असतांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. अखेर मध्यरात्री २ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. पहाटे पाच वाजेपर्यंत आगीशी संबंधित बचावकार्य युद्धपातळीवर सुरु होतं. या दुर्वेवी घटनेत जिवित हानी झाली नसली तरी कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर येत आहे. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असून अग्नीशमन दलाने वेळेत बचावकार्य सुरु केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
हेही वाचा- सरकारी कार्यालयात जाण्यापूर्वी ‘हे’ वाचाचं; नाहीतर…; आजपासून कारवाईला सुरुवात
अंबरनाथ उल्हानरगर आणि डोंबिवली एमआयडी परिसरात कंपनीतील रासायनिक प्रकियांमुळे स्फोट होण्याचं प्रमाण वाढत आहे. यामुळे कंपनी कर्मचारी आणि एमआयडी परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना कायमच जीव मुठीत घेऊन रहाव लागतं. तसंच कंपनीत दुषित रायानिक वायूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे आणि डोकेदुखीच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. या पार्श्वभूमीवर अदयाप प्रशासनाने कोणताीही ठोस आरोग्य सुविधा केलेल्या नाही. तसंच कंपन्यामधून सोडण्यात येणारा दुषित वायू आणि सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रित्या लावण्यात येण्यासाठी कोणत्याही उपाय योजना नसल्याने येथील स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.