सामान्य स्त्रीची असमान्य गोष्ट; हर्षल सरोदे यांची पंढरपुर ते घुमान सायकल वारी
कल्याण : श्री क्षेत्र पंढरपुर ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची कर्मभूमी आणि त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेले पंजाबमधील घुमान गावपर्यंत भव्य रथयात्रा आणि सायकल यात्रा ही दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली होती. या सायकल वारीत डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये राहणाऱ्या 48 वर्षीय हर्षल सरोदे यांनी भाग घेवून यशस्वीपणे 23 दिवसात एकूण 2 हजार 674 किलोमीटर अंतर पार करून पूर्ण केली. या सायकल यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपुर येथून अंदाजे 100 जणांनी सुरवात केली होती मात्र हर्षल यांनी सलग मदतीला असणार्या वाहनाची मदत न घेता त्यांनी ही यात्रा पूर्ण केली. विशेष म्हणजे हर्षल यांच्या सायकलमध्ये कधी कधी प्रॉब्लेम निर्माण झाले होते पण अनेक जण त्यांच्या मदतीला येत असत.
हर्षल सरोदे यांनी यापूर्वीही अनेकदा लांब पल्ल्यांच्या सायकल फेर्या पूर्ण केल्या आहेत. याबद्दल व इतर सामाजिक क्षेत्रात कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सरोदे यांचा मुलगा दिव्यांग असून त्याला अधून मधून फिट येत असतात, असं असतानाही आणि काही वर्षापूर्वी त्यांच्या एका मुलाचे अपघाती निधन झाले.मात्र असं असूनही त्यांनी धैर्य सोडले नाही. त्यांच्या दिव्यांग मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आणि तो या आजारातून बरा व्हावं या इच्छेने त्यांनी ही सायकल वारी केली आहे. त्यासाठी त्यांचे पती ललित यांनी घरात थांबून मुलाची सेवा करून त्यांना सहकार्य केले.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; जैन मंदिरात घुसून चोऱ्या करणाऱ्याला घेतले ताब्यात
एमआयडीसी निवासीमध्ये त्यांच्या पुढाकाराने एव्हरग्रीन सायकल प्रेमी असा एक ग्रुप तयार केला असून आरोग्य व पर्यावरण राखणे हा त्यांच्या मुख्य उद्देश आहे. हर्षल यांना कठीण परिस्थितीशी केलेल्या संघर्षाची जाणीव आहे .त्यामुळे त्या ज्येष्ठ महिला, घरकाम करणार्या महिला, लहान मुले/मुली आणि विकलांग मुलांना सायकल शिकवण्याचे धडे देत असतात. अशा या धाडसी आणि सामाजिक कार्य करणार्या हर्षल सरोदे या हरहुन्नरी महिलेचा पद्मश्री पुरस्कार विजेते गजाननराव माने यांच्या हस्ते वंदेमातरम उद्यानात सत्कार करण्यात आला. हर्षल सरोदे यांनी केलेली उल्लेखनीय कामागिरी ही समस्त स्त्री वर्गासाठी कौतुकाची बाब आहे. हर्षल फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषवर्गासाठी देखील आदर्श आहेत.