सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : जैन साधकांचा वेष परिधान करून जैन मंदिरात घुसून चोऱ्या करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. त्याने पुण्यासह राज्यातील घाटकोपर वाई, चिखली, डोंबिवली अशा ठिकाणी देखील चोऱ्या केल्याची माहिती समोर आली असून, पैशांची चणचण भासत असल्याने चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नरेश आगरचंद जैन (वय ४५, रा. बोम्बे चाळ, सी.पी. टैंक गिरगाव, व्ही. पी. रोड, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरिक्षक युवराज नांद्रे, पोलीस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, कुंदन शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे.
कार्तिकी पोर्णिमेनिमित्त जैन समाज मंदिरांमध्ये तसेच घरातील देवांची पूजा करतात. त्यादिवशी देवाला दागिने देखील घातलेले असतात. स्वारगेट परिसरात एका घरफोडीत घरातील जैन मंदिरातून दागिने नेले होते. तर, पुनावाला गार्डन येथील एका मंदिरात देखील चोरी झाली होती. तेथून सोन्याचे मुकूट व चैन चोरून नेली होती. यासोबतच आणखी तीन ते चार ठिकाणी जैन मंदिरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठ निरिक्षक युवराज नांद्रे यांनी तत्काळ याचे गांर्भिय लक्षात घेऊन विशेष तपासपथकाची निर्मिती केली होती. तसेच, आरोपींचा माग काढण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानूसार, तांत्रिक विश्लेषन व सीसीटीव्ही तपासले. पुणे आणि मुंबई अशा दोन शहरात खबऱ्यांकडून माहीती काढली. तेव्हा पोलीस हवालदार सागर केकाण यांना बातमीदाराकडून माहीती मिळाली की, अशा प्रकारचे गुन्हे मुंबई, डोंबिवली व इतर परिसरात घडले असून त्यातील आरोपी मुंबईतील गिरगाव भागात राहण्यास आहे.
हे सुद्धा वाचा : शाळेत घुसून मुलीला घेऊन गेला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
त्यानूसार, पथकाने तत्काळ गिरगाव गाठले. तसेच, शोध घेऊन संशयीत आरोपी नरेश जैन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हे केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पैशांच्या चणचण भासत असल्याने गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्याने यापुर्वी देखील घाटकोपर वाई, चिखली, डोंबिवली इत्यादी भागात सुमारे ८ ते १० ठिकाणी अशाच पध्दतीने मंदीरांमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मंदिरात जाताना जैन साधकांच्या वैशात जाऊन देवाचेच दागिने चोरी करत होता.