बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहरात वाहतूक नियमनासाठी सिग्नल यंत्रणा बसवली जाते आहे. त्यासाठी शहरातील चौकांची स्वच्छता आणि जागा उपलब्ध करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोहिम सुरू आहे. या मोहिमेत बदलापूर पश्चिमेतील दत्त चौकात असलेल्या सुमारे 100 वर्षे जुन्या वडाच्या झाडालाही धक्का बसणार होता. दत्त चौकातील हे डेरेदार वडाचे वृक्ष हटवण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती. याबाबतची सूचना आणि हरकती मांडण्याची नोटीस कुळगाव बदलापूर नगर परिषदेने एका वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती.
बदलापुरच्या दत्त चौकातील वडाचे झाड ही या परिसराची ओळख आहे. अनेक पिढ्यांना या वडाच्या घनदाट वृक्षाने सावली दिली आहे. त्यामुळे या वडाच्या झाडाशी सर्वांचे भावनिक नाते जुळले आहे. विकासाच्या नावाखाली अनेकदा या वडाला पाडण्याचा, हटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र स्थानिक बदलापूरकर, सुजाण पत्रकार आणि प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्या वतीने कायमच याला विरोध करण्यात आला. सध्या बदलापुरात वाहतूक सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी वडाचे झाड हटवण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरु होते, याबाबत नोटीस प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात आल्या होत्या.
प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्या वतीने तातडीने या विषयाला हरकत घेण्यात आली होती. तसंच निवेदन कुळगाव बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारूत गायकवाड यांना देण्यात आले. त्यांनीही या हरकतीची गांभीर्याने दखल घेत दत्त चौकातील जुने वडाचे झाड न हटवण्याचा निर्णय घेतला. तशी माहिती प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या सदस्यांना त्यांनी फोनद्वारे दिली असल्याचं प्रेस क्लबचे सचिव संजय साळुंखे यांनी सांगितले. तसेच या झाडाच्या संगोपनासाठी प्रयत्न करू, त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ,रस्ता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करू असे आश्वासनही यावेळी मारूती गायकवाड दिल्याचे साळुंखे यांनी सांगितले आहे. प्रेस क्लब ऑफ बदलापुरही पालिका प्रशासनाच्या विकास धोरणात त्यांच्या पाठीशी आहे. फक्त पालिकेने शहराची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी प्रतिक्रिया प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे सचिव संजय साळुंखे यांनी दिली आहे.