आता ड्रोन उडवल्यास खैर नाही, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महत्त्वपूर्ण निर्णय
ठाणे स्नेहा जाधव काकडे : भारत पाक युद्धजन्य स्थितीवर देशातील सुरक्षा यंत्रणा सर्तक झाली आहे. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक शहरात काही निर्बंध जारी केले आहेत. कोणीही विनाकारण फटाके वाजवू नयेत असं आवाहन देखील केंद्रसरकारकडून करण्यात येत आहे. अशातच आता ठाणे पोलीस अॅक्शनमोडवर आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू (Unmanned Aerial Vehicles – UAVs) उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा तत्सम उपकरणे उडवण्यास मनाई असेल. हा आदेश दि.14 मे 2025 पासून लागू झाला असून 3 जून 2025 पर्यंत तो अंमलात राहील.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि तातडी लक्षात घेऊन हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे, असेही सांगण्यात आलं आहे. उपायुक्त श्रीकांत परोपकारी विशेष शाखा, ठाणे शहर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
भारत पाकमध्ये जरी शस्त्रसंधी झाली असली तरी देशात आणि प्रत्यक्षदर्शी सीमाभागात अजूनही सुरक्षा यंत्रणेकडून अलर्ट जारी आहे. पाकने केलेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई आणि उपनगरीय विभागात ड्रोन उडविण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यासगळ्या तणावपूर्ण वातावरणात देशवासियांनी सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात येत आहे.