वाहतूक कोंडीला दिलासा, भाईंदर पाडा उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला
ठाणे : ठाणे शहराच्या वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भाईंदरपाडा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज एमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या उड्डाणपुलाची विशेष बाब म्हणजे तो मेट्रो लाईन 4 व 4A च्या व्हायाडक्टवर उभारण्यात आला आहे. त्यामुळे एकाच जागेचा प्रभावी वापर करून रस्ते आणि मेट्रो यांच्यातील समन्वय साधण्यात आला आहे. भविष्यात मेट्रो सेवा सुरू झाल्यावर या भागातील रहिवाशांना सहजपणे मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पाद्वारे ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, जेएनपीटी तसेच बोरिवली, वसई-विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे.
तसेच ठाणेकरांना दिलासा देणारा हा प्रकल्प म्हणजे केवळ रस्ता नव्हे, तर जीवनशैलीतला बदल आहे. घोडबंदरसारख्या महत्त्वाच्या रस्त्यावर झालेली ही सुधारणा ही वाहतूक सुरळीत करण्यासोबतच संपूर्ण क्षेत्राच्या विकासासाठी प्रेरक ठरेल. वाहतूक कोंडी कमी करून वेळ आणि इंधन वाचवण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर भाईंदरपाडा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा ही मुंबई महानगर प्रदेशाच्याच्या शाश्वत आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने घेतलेली महत्त्वपूर्ण पावले आहेत. या प्रकल्पामुळे केवळ वाहतुकीचा वेग वाढणार नाही, तर आर्थिक आणि औद्योगिक हालचालींनाही चालना मिळेल. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता आणि सुरक्षितता यांना आम्ही प्राधान्य देत आहोत, अशी प्रतिक्रिया MMRDA आयएएस महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
उड्डाणपुलाची एकूण रॅम्प लांबी: 601 मीटर
(ठाणे कडील बाजू – 391.48 मी, भुयारी मार्ग – 20.4 मी, बोरिवली कडील बाजू – 189.88 मी)
• मार्गिका: 2+2 (7.5 मीटर + 7.5 मीटर)
• भुयारी मार्ग: 2 x 2 लेन (लांबी 20.4 मी x रुंदी 19.7 मी)
• वाहन घनता: अंदाजे 73,333 PCU
• घोडबंदर रस्ता हा गुजरात ते जेएनपीटी दरम्यानच्या आंतरराज्यीय जड वाहन वाहतुकीसाठी कणा आहे.
• या मार्गावरच्या गायमुख ते वाघबिल दरम्यानची वाहतूक कोंडी आता लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
• जड वाहने आणि ऑफिस प्रवासी यांच्यामुळे या रस्त्यावर नेहमी ताण असतो, तो आता कमी होईल.
• उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन, सरासरी वेग वाढेल.
या प्रकल्पामुळे ठाणे पूर्व, घोडबंदर रोड, गायमुख, कासारवडवली, ब्रह्मांड, वाघबिल आणि भाईंदरपाडा परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे. दररोजचा प्रवास जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल. याशिवाय, या प्रकल्पात स्थानिकांना घोडबंदरच्या डाव्या उजव्या बाजुला जाता यावे म्हणून स्वतंत्र भुयारी मार्ग (Subway) सुद्धा बांधण्यात आला आहे. त्यामुळे वरच्या उड्डाणपुलावरील सामान्य वाहतुकीवरील ताण कमी होईल. परिणामी, गायमुख ते वाघबिल दरम्यानची वाहतूक कोंडी सुटेल, आणि घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक अधिक गतिमान आणि प्रदूषणमुक्त होईल.