Jitendra Awhad: "राजकीय नेते निवडणूक अधिकाऱ्यांना घरी बोलावून...": प्रभाग रचनेवरून आव्हाड आक्रमक
ठाणे: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्य सरकार आणि निवडणुक आयोगाने याबाबत तयारी सुरू केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले आहे. आयोगाला लिहिलेल्या पत्र असेल किंवा अनधिकृत बांधकाम याबाबत त्यांनी भाष्य केले आहे.
स्थानिक स्वराज्य संथानच्या निवडणुकांबबत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “2017 नंतर 2022 मध्ये प्रभाग रचनेला सुरुवात झाली आहे. मात्र त्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. मनाला वाटेल त्या पद्धतीने ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. राजकीय नेते निवडणूक अधिकाऱ्यांना घरी बोलावून प्रभाग रचना करतात. असे करायचे असेल तर प्रभाग रचना करू नका.”
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कोणता प्रभाग कसा होता, याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. शर्मा यांनी केलेली प्रभाग रचना आणि नंतर निवडणूक आयोगाने सूचना दिल्यावर केलेले प्रभाग सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचननेला खेळ बनवू नये. अधिकारी घाबरून प्रभाग रचना तयार करतात. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पुरावे देतो. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. १६००० मत एका रात्रीत वाढत असतील तर हा कसला जनतेचा कौल म्हणायचचा? ”
ठाण्यातील अनधिकृत बांधकामावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “रहिवाशी त्या ठिकाणी राहायला गेल्यावर कशाला कारवाई करता?” असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड उपस्थित केला आहे.
मुंब्रा लोकल अपघातावरुन जितेंद्र आव्हाड संतापले
मुंबईत दोन लोकल ट्रेनमध्ये एक दुर्दैवी अपघात झाला. कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. चालू लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये 13 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडणीने रुग्णालयात दाखल आले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन जखमींना दिलासा दिला आहे. यानंतर रेल्वे अपघातानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया द्वारे पोस्ट करुन मागणी देखील केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, “धावत्या रेल्वेगाडीतून पडून झालेले मृत्यू हे वेदनादायक आहेत. लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेतील प्रवास हा नेहमीच जीवघेणा असतो. रेल्वेचा न सुधारण्याचा अट्टाहास हा अनेकांचा जीव घेऊन जातोय,’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केला आहे.