Thane News : ठाणे मनपा हद्दीत व्यावसायिक इमारतीत अनधिकृत बांधकाम ; नागरिकांचा जीव धोक्यात
ठाणे/ स्नेहा काकडे : गावदेवी मार्केट (गावदेवी भाजी मंडई ) ही व्यवसायिक इमारत ठाणे महानगरपालिकेकडून 2014 साली बांधण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीच्या बेसमेंटला दुचाकी वाहनांची पार्किंग, तळमजल्यावर भाजी मंडईसह (भाजीपाला दुकाने) इतर व्यावसायिक गाळे व वरील मजल्यावर ठाणे महानगरपालिकेचे नौपाडा कोपरी प्रभाग समिती कार्यालय, तसेच दुय्यम निबंधक कार्यालय व इतर कार्यालये असल्याने दररोज हजारो लोकांची ये जा या ठिकाणी होत असते. मात्र या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओक्युपेशन सर्टिफिकेट नाही. ओसी असल्याशिवाय बिल्डर वा मालक कुणालाही इमारतीचा-घराचा ताबा देऊ शकत नाही. असे झाल्यास हा गुन्हा मानला जातो, असे असतानाही ठाणे महापालिका स्वतःच्या मालकीच्या ओसी नसलेल्या इमारतीचा व्यावसायिक वापर मागील दहा वर्षापासून सर्रासपणे करत आहे.
नियमाप्रमाणे ओसी असल्याशिवाय कोणालाही फायर एनओसी देता येत नाही. मात्र या इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर प्राथमिक फायर एनओसी देताना अग्निशमन विभागाकडून अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार या इमारतीस स्वतंत्र नियंत्रण कक्ष पुरवणे बंधनकारक असल्याचे तसेच स्थायी अग्निशमन व प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित असले बाबतचा अहवाल वर्षातून दोनदा अग्निशमन विभागास सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. मात्र मागील दहा वर्षात असा कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही व सद्यस्थितीत या इमारतीची अग्निशमन यंत्रणाच योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
या इमारतीतील तळ मजल्यावरील गाळे पुनर्वसन स्वरूपात भाजी मंडई साठी दिलेले आहेत.परंतु भाजीविक्री न करता मोठ्या प्रमाणात येथील गाळ्यांच्या वापर कपड्यांच्या दुकानांसाठी केला जात आहे. तसंच या इमारतीमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त आत येण्याचा मार्ग, बाहेर जाण्याचा मार्गातील पूर्वेकडील जिन्यावर उत्तरेकडील रॅम्पवर अनधिकृत बांधकाम केल्याचे शहर विकास विभागाच्या पाहणी अहवालातून निदर्शनात आले. तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात कपड्याची दुकाने असल्याने आग लागण्याची घटना घडल्यास बाहेर पडताना चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम शहर विकास विभागाची पूर्व परवानगी न घेता स्थावर मालमत्ता विभागाने पुनर्वसन स्वरूपात दिले असल्यास एक प्रकारे गाळेधारकांची देखील केलेली फसवणूक आहे.
त्यामुळे या पद्धतीने महानगरपालिकाच आत बाहेर येण्याच्या जिन्याच्या मार्गात अनधिकृत बांधकाम करून पुनर्वसन कसे काय करू शकते असा सवाल ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत केलेली आहे.महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीची ओसी नाही,मंजूुर नकाशा व्यतिरिक्त बांधकाम,फायर ऑडिट नाही त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.आतातरी याला जबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्त कारवाई करणार का…? असा सवाल उपस्थित केला आहे.