ठाणे/ स्नेहा काकडे: शहापूर येथील मौजे अल्याणी व गेगाव या गावांमध्ये जिल्हा परिषद ठाणे व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीसंदर्भातील उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे, कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, तसेच गटविकास अधिकारी, तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमांतर्गत मौजे अल्याणी येथे पट्टा पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक करण्यात आले, तर मौजे गेगाव येथे मशीनद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक राबविण्यात आले. दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत पारंपरिक भात लागवडीच्या तुलनेत पट्टा पद्धत व यांत्रिकी पद्धतीने लागवड केल्यास होणारा खर्च, मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ समजावून सांगितला. शाश्वत शेतीसाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब का आवश्यक आहे, हे त्यांनी वास्तववादी उदाहरणांसह स्पष्ट केले.यानंतर जिपसेस योजनेअंतर्गत DBT (Direct Benefit Transfer) द्वारे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या कृषी साहित्याची पाहणी करण्यात आली. संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या साहित्याचा योग्य वापर कसा करावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.
तसेच, शेतकऱ्यांनी भविष्यात तूर लागवडीचे क्षेत्र वाढवावे, यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यासोबतच भात व भाजीपाला उत्पादनानंतर त्याच्या विपणनासाठी शेतकरी गट कंपनी स्थापनेचे महत्त्व सांगण्यात आले. ही कंपनी शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कसा करून देऊ शकते, याबाबत शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमामध्ये महिला बचत गटांनाही विशेष महत्त्व देण्यात आले असून जिल्हा परिषद तर्फे त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते मग्रारोहयो योजनेअंतर्गत बांबू वृक्ष लागवड व आंबा वृक्ष लागवड देखील करण्यात आली. कार्यक्रमास अल्याणी व गेगाव येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, तालुका स्तरावरील कृषी अधिकारी विलास झुजारराव, कृषी विस्तार अधिकारी सचिन गंगावणे, दिनेश घोलप, ललित बडगुजर, तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होत. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतीतील प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून जिल्हा परिषद ठाणे व कृषी विभाग यांचे सहकार्य यापुढेही कायम राहणार आहे.