
जत : बिळूर (ता. जत) येथील बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिता तुकाराम माळी (वय २७), अमृता तुकाराम माळी (वय १३), अंकिता तुकाराम माळी (वय १०), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता निदर्शनास आली.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तिन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत. त्यांनी सासरवाडी कोहळी (ता. अथणी) येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.
[read_also content=”पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटात भाजपला खिंडार ; कोरेगाव बुद्रुकमधील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-lost-in-pimpri-pait-zilla-parishad-group-hundreds-of-workers-from-koregaon-budruk-joined-ncp-334477.html”]
पोलिस, ग्रामस्थ व नातेवाईक यांनी शोधाशोध केल्यानंतर तलावात चौघींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सोमवारी रात्री एक वाजता चौघींचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटने बद्दल बिळूर भागात उलट सुलट चर्चा सुरू होती. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.