साताऱ्यातील वाजेगाव येथील पूल गेला वाहून; कराड-चिपळूण मार्ग बंद, वाहतूकही वळवली
पाटण : कराड ते कोयनानगर मार्गाच्या कामाचे शुक्लकाष्ठ काही संपता संपेना. 9 वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामातील विघ्ने वाढतच आहेत. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे येथे अनेक अपघात झाले असतानाच सोमवारी या मार्गावरील वाजेगाव येथे सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामाशेजारी तात्पुरता टाकलेला भराव मुसळधार पावसाने वाहून गेला. याचा फटका कराड-चिपळूण मार्गावरील वाहतुकीला बसला.
कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक 100 टक्के बंद झाली आहे. प्रशासनाने तातडीने खबरदारी या मार्गावरील वाहतूक मोरगिरी मार्गे कोयनानगरकडे वळवली. कराड-चिपळूण मार्ग हा मोठ्या प्रमाणात रहदारी असलेला महत्त्वाचा मार्ग आहे. वाजेगाव येथील पुलाचा सोमवारी दुपारी भराव खचल्याने कराड, सातारा, पाटण येथून कोयनानगर, वाजेगाव, संगमनगर, चिपळूणकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, रस्ते व महामार्ग विभागाने खचलेला भराव पुन्हा भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. परंतु, सततच्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत, त्यामुळे मार्ग कधी सुरळीत होईल याबाबत अनिश्चितता आहे.
पर्यायी रस्त्याने वळवली वाहतूक
वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने नेरळे-मेंढेघर मार्गावरून पर्यायी वाहतूक वळवली आहे. या मार्गावर पोलीस प्रशासन सतर्क असून, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. ओळेकर यांच्या देखरेखीखाली आवश्यक यंत्रणा कार्यरत आहे.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
दरम्यान, हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, भरावाचे मजबुतीकरण योग्यरित्या न केल्याने तसेच ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.