सातारा : गोडोली-अजेंठा या मार्गावरुन जाणाऱ्या काळीपिवळी या प्रवासी जीपचालकाचे नियंत्रण सुटल्याने लोखंडी गेट तोडून जीप एका इमारतीच्या तळघरातील दुकानात घुसली. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. एकजन गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.
दिनेश गंगाधर जंगम (वय ५५, रा. गोडोली, सातारा), अक्षय अशोक पाटणे (वय ३0, रा. कण्हेरी, ता. खंडाळा) तर दुकानातील महिला कामगार रेश्मा चांदसाब शेख (वय ३४, मोरे वस्ती, गोडोली, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात गाळेधारकाचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोवई नाक्यावरुन प्रवासी घेवून काळी पिवळी जीप (क्रमांक एमएच ११ बीडी ५४०७) गोडोलीमार्गे अजेंठा चौक बाजूकडे निघाली होती. या दरम्यान, पावसाची संततधार सुरुच होती. दरम्यान जीपचालकाने पादचारी जंगम व पाटणे यांना ठोकर दिली, यामुळे ते जाग्यावरच कोसळले. जीप तशीच पुढे भरधाव वेगाने जाऊन मारुती शोरुम शेजारील दुकानाचे लोखंडी गेट तोडून तळघरातील दुकानात घुसली. यामुळे मोठा आवाज झाला.
दरम्यान दुकानातील महिला कामगार रेश्मा चांदसाब शेख या जखमी झाल्या. यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत जीपचालक पळून गेला. नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक पंधरा ते वीस मिनीटे विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, वाहतूक पूर्ववत केली. त्यानंतर या अपघातातील गाडी क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली. नंबरवरुन संबंधित गाडी वाठारस्टेशन येथील असल्याचे समजते. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार जयवंत कराळे करत आहेत.