इंदापूर : “भान हरपून खेळ खेळतो,
दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..
भक्तिने भरलेला रिंगण सोहळा”
पाहावा ‘याचि देही याचि डोळा’ या रचनेचा प्रत्यय आणून देणाऱ्या या सोहळ्यात टाळ मृदुंगाचा गजर अन् पुंडलिक वरदा हरि विठ्ठलच्या जयघोषात डोळ्यांचे पारणे फेडणारे, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी (दि.२२) दुपारी पार पडले.
निमगाव केतकी मुक्काम उरकून येथील विद्यालयाच्या प्रांगणात पालखी येताच वारकऱ्यांनी ग्यानबा-तुकाराम नामघोषावर ठेका धरला. टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी यांच्यापाठोपाठ तुळशी वृंदावन डोक्यावर पेलत महिला मंडळी जोमाने धावल्या.शेवटी तुकोबारायांचा मानाचा अश्व रिंगणात आला. भाजपा नेते आ.आशिष शेलार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते मानाच्या अश्वांची पुजा करण्यात आली. क्षणार्धात अश्व रिंगण पूर्ण करण्यासाठी धावला.डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केले. ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ची गर्जना झाल्याबरोबर लोकांनी घोड्याच्या टापांखालची माती मस्तकी लावली.
तत्पूर्वी,जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी रथ रिंगणस्थळी दाखल होताच खासदार राहुल शेवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पालखी रथाचे सारथ्य करून रिंगण प्रदक्षिणा घातली.
इंदापूरातील गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी व या सोनेरी क्षणाची आठवण मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी लाखो वारकरी,नागरिक, भक्तांचा जनसागर रिंगण ठिकाणी उसळला होता.या वैष्णवांच्या मेळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दिंडीच्या माध्यमातून पालखी बरोबर पायी वारीत सहभागी आहेत. पालखी यंदा प्रथमच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील नूतन पालखी स्थळी मुक्कामी थांबणार आहे.उद्या पालखी चा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी (ता. इंदापूर) येथे असणार आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील धावले रिंगणी…
जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळ्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रशासकीय अधिकारी, पोलीस बांधव यांसोबत रिंगणात धावले.
यावेळी खासदार राहुल शेवाळे,खासदार धनंजय महाडिक,आमदार आशिष शेलार,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ॲड.निहार ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे,भरत शहा, राजवर्धन पाटील,कैलास कदम,बाळासाहेब ढवळे, गजानन गवळी,पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस, विठ्ठल ननवरे,अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे,अनिता खरात, महेंद्र रेडके, शेखर पाटील, स्वप्नील सावंत यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी रामराजे कापरे,पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या ठिकाणी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली.पालखी सोहळ्याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.