जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला अन्...; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
पिंपरी : माणूस हे तर सांगू शकतो की त्याचा जन्म कधी झाला, पण त्याचा मृत्यू कधी होईल? हे त्याला सांगता येत नाही. पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिलिंद कुलकर्णी (वय ३७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना जिममधील सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असून, शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून नायट्रो जिममध्ये नियमितपणे व्यायाम करत होते. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे व्यायाम सुरू केला. काही वेळानंतर त्यांनी विश्रांतीसाठी एका ठिकाणी बसून पाणी प्यायले. मात्र, काही क्षणातच त्यांना भोवळ आली आणि ते अचेत अवस्थेत खाली कोसळले. जिममधील इतर सदस्यांनी तातडीने त्यांना जवळच्या मोरया रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक वैद्यकीय अंदाज काय सांगतो?
मोरया रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णालयाच्या अहवालानुसार, “अशा घटना पूर्वीही आढळल्या आहेत. काही वेळा व्यक्तींना हृदयविकाराचे लक्षणे नसतात, तरीही अंतर्गत ब्लॉकेज किंवा जास्त स्ट्रेसमुळे अचानक अटॅक येऊ शकतो,” असे डॉक्टरांनी सांगितले.
“व्यायाम सुरू करण्याआधी हृदयाची संपूर्ण तपासणी आवश्यक”
डॉ. गौतम जुगल, हृदयरोगतज्ज्ञ यांनी सांगितल्याप्रमाणे, “नियमित व्यायाम करणं हे आरोग्यासाठी उपयुक्त असलं तरी, व्यायाम सुरू करण्यापूर्वी स्वतःची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः हृदयाच्या आरोग्यासंदर्भातील ECG, 2D Echo, आणि TMT (स्ट्रेस टेस्ट) या तपासण्या केल्यास हृदयाची कार्यक्षमता आणि त्यावरील ताण सहन करण्याची क्षमता समजते. पुढे त्यांनी सांगितले की, अचानक सुरू झालेला अतिशय तीव्र व्यायाम किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणं, हे हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने आपली वैद्यकीय स्थिती, वय, आणि शरीरसामर्थ्यानुसार व्यायामाची तीव्रता ठरवावी. तसेच, धूम्रपान आणि इतर व्यसने हृदयावर दीर्घकालीन दुष्परिणाम करणारी असतात. व्यायामादरम्यान अशा व्यसनांचे गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि वैद्यकीय सल्ल्याने व्यायामाचा प्रारंभ करणे हे दीर्घकालीन आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.” असे डॉ. गौतम जुगल म्हणाले.