वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या पांचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन घडविले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारूतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली आहे.
1979 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. मराठी माणूस हा जरी उत्कृष्ठ पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणे आर्थिकदृष्ट्या अन् सांसारिक अडचणींचा डोंगर पार करुन पूर्ण करणे शक्य होत नसते. याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरशिल्पे साकारुन ठाणेकरांना भारतातील मंदिरांचे दर्शन पांचपाखाडीमध्येच घडविले आहे. सन 1979 पासून आजतागायत शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृतीदर्शन, हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेला काश्मिरमधील चरार-ए-शरीफ दर्गाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन, युवाशक्ती, गणेश दरबार, मिनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा-अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारुन नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहचविली आहे.
यंदा या मंडळाने राज्यातील अकरा जागृत मारूती मंदिरांचा देखावा उभारला आहे.
अष्टविनायकाच्या धर्तीवर अकरा मारूतींचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहेत. त्याच अनुषंगाने 17 व्या शतकात प्रतिष्ठापीत केलेले शहापूर , सातारा येथील चुन्याचा मारूती, मसूर – सातारा येथील मसूर मारूती, चाफळ – सातारा येथील दास मारूती; वीर मारूती , शिंगणवाडी – सातारा येथील खडीचा मारूती, उंब्रज – सातारा येथील मठातील मारूती, माजगाव येथील माजगावचा मारूती, बहे- सांगली येथील बहेचा मारूती, मनपाडळे – कोल्हापूर येथील मनपाडळेचा मारूती, पारगाव- कोल्हापूर येथील बाळ मारूती आणि शिराळे-सांगली येथील वीर मारूती या अकरा मारूतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यासाठी चार विशाल स्तंभांवर फायबर, लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून 61 × 20 फूट आकारमानाचे दगडी भिंत भासावे, असे 15 फूट उंचीचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरात 20×20 फूट आकारमानाचा गाभारा, 41×20 फूट आकारमानाचे सभामंडप, 10×20 फुटांचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे.
या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ( ठाण्याचा राजा ) प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार , उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक भंगरथ यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी आहोरात्र परिश्रम घेत आहेत.