मुंबई : रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर (Harbour Railway) मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीने देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या विद्याविहार स्थानकापर्यंत डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच, भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच, कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहेत.
पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. पनवेल (Panvel) येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर (Trans-Harbour Railway) मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावणार आहेत.