होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय
मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतर आता पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार 16 जूनला तर विदर्भात सोमवार 23 जूनपासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरीता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, राज्यमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना नजिकच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश व इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यात येईल.
तसेच शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल, यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येतील.
सर्वांगिण विकासासाठी उपाययोजना सुचवा
राज्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळांना भेट द्यावी याबाबत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकताच आढावा घेतला. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी यांनी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना सूचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात ‘निपूण महाराष्ट्र अभियान’ राबवणार
विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व कौशल्य विकासासाठी राज्यात निपूण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील ७५ टक्के विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे ध्येय आहे. पालकांचा प्रतिसाद मिळण्यासाठी शासनाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमामध्ये पालकांशी हितगुज साधावे.