मागील काही निवडणुकांप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत देखील राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प निवडणुकीचा मुद्दा बनला असुन त्यावरुन समर्थकांसह विरोधकांची शस्त्रे समोरासमोर ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच आता प्रकल्प विरोधकांनी काही गावात रिफायनरी समर्थन करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मते मिळणार नाहीत अशा आशयाचे बॅनर लावल्याने तळ कोकणातील ही लोकसभा निवडणुक पुन्हा एकदा प्रकल्पाचा मुद्दा पुढे करुन लढवली जाण्याची शक्यता आहे.
राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या एकुण तीन प्रकल्पांपैकी प्रामुख्याने जैतापूरचा अणूऊर्जा आणि नंतर रिफायनरी अशा दोन प्रकल्पांवरुन काही निवडणुकांवर त्याची पडलेली पडछाया पहायला मिळाली आहे. यामध्ये सर्वप्रथम जैतापूर परीसरात आलेल्या सुमारे दहा हजार मेगावॅट अणूऊर्जा प्रकल्पावरुन झालेले राजकारण त्यातुनच झालेले संघर्ष पहायला मिळाले. निसर्गाचा नाश या भितीखाली प्रकल्पाला सुरु झालेला विरोध थेट निवडणुक आखाड्यापर्यत पोहचला होता. जैतापूर विरोधात उतरलेल्या विरोधकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या एका राजकीय पक्षाला अनेक निवडणुकांत जोरदार राजकीय लाभ झाला होता. त्या कालखंडात झालेल्या लोकसभा, विधानसभा सह जिल्हा परीषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायत अशा प्रत्येक निवडणुकांत जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा प्रकल्प क्षेत्रात केंद्रस्थानी राहिला होता. प्रकल्प विरोधातील झालेल्या मतदानाने जय पराजयातील अंतर निश्चीत केले होते. तालुक्याच्या पश्चिम भागात प्रकल्प विरोधाचा मुद्दा प्रभावी ठरला होता.
कालांतराने जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा काहीसा मागे पडला आणि तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील नाणार परीसरात तेलशुध्दीकरणाचा (रिफायनरी) प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातुन आला होता. तो प्रकल्प सुध्दा पर्यावरणाच्या नावाखाली मोठा विरोध झाला होता. मात्र सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी राज्यातील बिघडत असलेली राजकीय गणिते सुधारताना ऐन निवडणुक तोंडावर रिफायनरी प्रकल्पाची काढण्यात आलेली अधिसुचना शासनाला रद्द करावी लागली होती. तरी देखील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातुन निवडणुक लढविली गेली होती.
नाणारमधुन रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्प बारसू सोलगांव परीसरात व्हावा म्हणुन गेली दोन वर्षे कशा पध्दतीने मागण्या झाल्या ते समस्त तालुकावासीयांनी पाहिले. समर्थन आणि विरोध अशा दोन्ही बाजुंचे पदर प्रकल्पाला असल्याने या लोकसभा निवडणुकीत दोन्ही बाजू पुन्हा एकदा समोरासमोर येऊन ठाकल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजापूर तालुका आणि त्यामध्ये नाणार व बारसू परीसरात प्रकल्पावरुन आरोप प्रत्यारोपांची शस्त्रे सज्ज झाली आहेत. रिफायनरी विरोधाचे बॅनरही काही भागात झळकले प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्याला मते मिळणार नाहीत असा इशारा देखील देणारे बॅनर सोशल मिडीयावर पहावयास मिळाले. त्यामुळे लोकसभेची ही निवडणुक देखील कोकणात प्रकल्पाभोवती फिरताना दिसेल हे निश्चीत झाले आहे.