फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील वाढते लोकसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे अशावेळी काही आरोग्याबाबत मोठी घटना घडल्यास वरपासून खालपर्यंत सगळी सरकारी यंत्रणा आणि मंत्र्यांची धावपळ सुरू होते. मात्र तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.त्यामूळे अशा संभावीत घटनांची वाट न पाहता अद्ययावत आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी मोखाडा तालुक्यातून होत आहे.
मोखाडा तालुक्यात एकूणच आरोग्य सुविधांची कमालीची वाणवा आहे. त्यात स्थानिक आरंभशूर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतील दफ्तर दिरंगाई यामुळे एकूणच आरोग्य व्यवस्थेची अवस्था ही ” बैल गेला, आणि झोपा केला” अशी झालेली आहे.पर्यायाने काही दुर्घटना घडली तरच प्रशासनाला जाग येते आणि तात्पुरती धावपळ आणि जुजबी उपाययोजना सुरु होते.त्यानंतर शिळ्या कढीला नवा उत याप्रमाणे पुन्हा खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय आणि मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासंबंधी चर्चा सुरु होतात.मात्र वातावरण अंमळ थंड झाले की पुन्हा परिस्थिती जैसे थे होते.ही वास्तविक परिस्थिती आहे.तथापी आजची रुग्णालयांची डबघाईस आणि वाढलेल्या रुग्णांची संख्या पाहता दर्जा द्याल तेंव्हां दया अगोदर या रुग्णालयाला 30 खाटा वरून 50 खाटाची परवानगी दया अशी प्रथोमोपचारिक मागणी आता होत आहे कारण आजच्या घडीत या रुग्णालयात वाढलेल्या रुग्णांची संख्या पाहता या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी नर्स असा संपूर्ण स्टाफ वाढवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोखाडा तालुका ग्रामीण रुग्णालयात आज ज्या यंत्रणा आणि स्टाफ आहे तो मुळात 2011 च्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे.आजघडीला 2025 हे वर्ष चालु असल्याने किती प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे.त्याचा अंदाज बांधू शकतो.मात्र त्या पटीत आरोग्य सुविधा वाढविण्यात आल्या नसल्याचे जळजळीत सत्यही टाळता येत नाही.उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात अगदीच प्राथमिक सुविधा असल्यामुळे येथील रुग्णही ग्रामीण रुग्णालयात येत असतात. मात्र या रुग्णालयाला 30 खांटाची परवानगी असतांना प्रत्यक्षात ओपीडी काही शेकडोंत तर दाखल रुग्णांची संख्या 50 ते 100 च्या घरात असून दररोज 5 ते 10 प्रसूती याचवेळी काही सिझरच्या केसेसही दाखल होत असतात.तथापी काही काळ सुरू असलेली येथील ओटी आत्ता भुल तज्ज्ञ आणि स्री रोग तज्ज्ञा अभावी केवळ संतती नियमनावर येवून ठेपली आहे.
प्रचंड रुग्ण भार या रुग्णालयावर आहे मात्र सध्या 2 वैद्यकिय अधिकारी आणि 1 वैद्यकिय अधिक्षक तसेच पुरेशा नर्स व सफाई कामगार असे मनुष्यबळ येथे कार्यरत आहेत. त्यात 1 भुलरोग तज्ज्ञ,1 स्त्रीरोगतज्ज्ञ,1 बालरोगतज्ज्ञ व 3 वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत.यामुळे आहेत त्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येथील आरोग्य यंत्रणेेचा भार आलेला आहे. या रुग्णालयाला सरकार दफ्तरी 50 खांटाची परवानगी भेटली तर 5 वैद्यकीय अधिकारी 1 वैद्यकीय अधिक्षक असे 6 डॉक्टर आणि जवळपास 12 नर्सिंग चा स्टाफ मिळेल जेणे करून रुग्णालय यंत्रणेवर कसलाही भार न येता येथील कामकाज व्यवस्थित रित्या चालु राहील यासाठी येथील लोकप्रति निधी पालकमंत्री याची प्रबळ इच्छाशक्ती असल्यास या रुग्णालयाला काही दिवसांत हा दर्जा मिळू शकतो कारण 50 खाटांची परवानगी मिळण्यासाठीचे जे निकष असतात त्यासर्व निकषांत हे रुग्णालय बसत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील आणि विशेषतः मोखाडा तालुक्यातील संवेदनशीलता लक्षात घेऊन या रुग्णालयात मनुष्यबळ वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.अन्यथा येथील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न कधीही बिकट होऊ शकतो.