विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार
रत्नागिरी : नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना मी चार वेळा पराभवाची धुळ चारली आहे. आता पैशांचा, धनशक्तीचा वापर करुन जरी ते काठावर पास झालेले असले तरीसुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा करणे म्हणजे स्वत:ला संपवण्यासारखे आहे. शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे,’ असा पलटवार ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे.
ज्यांनी भाजपला तडीपार करण्याची भाषा केली, त्या शिवसेनेलाच कोकणच्या जनतेने तडीपार केले, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कोकणातून शिवसेना संपवण्याचा आसूरी आनंद जर फडणवीस व नारायण राणे घेत असतील तर अशा लोकांना कोकणातील जनता त्यांना योग्य वेळी जागा दाखवतील. लोकसभा निवडणुकीमध्ये करोडो रुपयाचा चुराडा करुन मते मिळवली, असा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे.
राज्यातील हे मंत्रिमंडळ तीन महिन्यांचे मंत्रिमंडळ असणार आहे. ऑक्टोंबरमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा राज्यात इंडिया आघाडीचे सरकार येईल. असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला. तसेच, ईव्हीएमची नक्कीच काहीतरी गडबड होते. मुंबई पश्चिममध्ये प्रशासनाला हाताशी धरून ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांच्या जागी रवींद्र वायकरांनी विजय मिळवला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
कोकण पदवीधर निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ‘ महाविकास आघाडी व काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे याचा मला आनंद आहे.. महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील कार्यकर्ते एकजुटीने, एक विचाराने ही निवडणूक लढवू आणि रमेश कीर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.