sudhir mungantiwar
पुणे : आपल्या देशाची जी सहिष्णुता आहे, आपल्या मातीचा जो खरा गुणधर्म आहे, त्या मातीमध्ये त्याग आणि सेवा यांची किंमत सर्वाधिक आहे. त्यामुळेच स्वामीपेक्षा सेवकाची पूजा करणारा जगातील एकमात्र देश म्हणजे भारत आहे. मात्र, आज समाजमाध्यमांचा वापर करून राज्याची आणि देशाची वाट लावण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असे परखड मत राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात उत्कर्ष प्रकाशनातर्फे रविवारी (दि. १०) ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांच्या ‘दृष्टिकोन’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ नेते माधव भांडारी, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मिलिंद एकबोटे, उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सुधाकर जोशी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले की, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध हे या देशाचे आदर्श झाले. आज जग आपल्या देशाचा विचार स्वीकार करत आहे. पण, दुर्दैवाने आपल्या देशातील परिस्थिती पाहता भविष्यात आपल्याला भारतीय संस्कृती देखील इतर देशांमधून आयात करावी लागेल की काय? अशी शंका येते. अशा परिस्थितीत आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा, पक्षाचा विचार कणखरपणे मांडणारे माधव भांडारींसारखे वक्ते आणि लेखक हे निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतात. चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे प्रवक्ते या नात्याने माधव भांडारी यांनी त्यांची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. आपल्या वैयक्तिक भूमिकेपेक्षा पक्षाचे विचार आणि भूमिकेला कायम महत्त्व दिले. या विचारांना लेखनाच्या माध्यमातून अधिकाधिक कार्यकर्ते आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची हातोटी आम्हाला चकित करणारी आहे, असे मत व्यक्त केले.