The road from Takali bypass to Anavali is in poor condition and has potholes
पंढरपूर : सध्या राज्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तुफान पावसामुळे काही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याचा फटका नागरिकांना आणि खास करुन जेष्ठ नागरिकांना बसत आहे. पंढरपूरातील रस्ते देखील खड्डेमय झाले असल्याची अवस्था आहे. टाकळी बायपास ते अनवली या रस्त्याची खड्डयांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.
कर्नाटकातून जड वाहतूक महाराष्ट्र राज्यातील पुणे, नगर, सातारा, मुंबई तसेच राज्यातील बरेच ठिकाणी जाण्यासाठी जड वाहतूक आणि या परिसरातील ग्रामस्थांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. टाकळी बायपास ते अनवली या दोन गावांमधील अंतर सुमारे दहा किलोमीटरचे आहे. मात्र, दोन्ही गावच्या हद्दीवरील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. हे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेकवेळा छोटे मोठे अपघात होत आहेत. मध्यंतरी ठेकेदाराकडून खड्डे बुजवण्यात आले होते परंतु ते खड्डे अर्धवटच सोडून दिले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खड्डे बुजवण्याचे हे काम झाल्यानंतर रस्त्यावर वरच्यावर माती टाकून, तसेच सोडून दिलेले आहे. यामुळे या ठिकाणी वाहने जाऊन मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, या रस्ता अरुंद असल्यामुळे टाकळी बायपास ते अनवली रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवण्यात यावेत यासाठी ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यास कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे .
कासेगाव व टाकळी ग्रामस्थ
टाकळी बायपास ते अनवली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती व रुंदीकरण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. दोन वाहने समोरासमोर आली तर खाली कोणी उतरायचे यावरून वाहनचालकांमध्ये अनेकवेळा वाद होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण लवकरात लवकर करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाघबीळ – पन्हाळा रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन
पन्हाळ्यामध्ये देखील रस्त्याची दुराव्यस्था झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस सार्वजनिक बांधकाम खात्याकडून डागडुजीच्या नावाखाली केलेल्या निकृष्ट कामामुळे व सध्या दुरवस्थेत अडकलेला वाघबीळ-पन्हाळा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पन्हाळा व परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
शनिवार – रविवार व सुटीच्या दिवशी पन्हाळ्याकडे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे सुटीच्या दिवशी, पर्यटकांच्या इतर दिवशी तालुक्याच्या कार्यालयात येणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर वर्दळ असते; परंतु रस्ता खराब असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात येथे झालेल्या चिखलाचे पाऊस उघडल्यानंतर धुळीत रूपांतर होते. प्रत्यक्ष डांबरीकरणाचे काम मात्र झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, जिल्हाधिकारी यांना प्रती पाठविल्या आहेत.