
कल्याणमधील 'या' भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
कल्याण ग्रामीणमधील पिसवली आडीवली परिसरात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था झाली आहे. केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत या परिसराची पाहणी केली. लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात याव्यात अशी सूचना अधिकारी वर्गास केली आहे. कुणाल पाटील यांच्या तर्फे रविवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. परिसरात असलेल्या समस्यांविषयी पाटील यांच्याशी चर्चा केली.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पिसवली, आडीवली परिसरात काही प्रमाणात विकास कामे झाली आहे. मात्र कोविड काळात महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने विकास कामांना ब्रेक लागला होता. कुणाल पाटील यांनी स्वखर्चातून अनेक कामे केली. मात्र एक व्यक्ती शासनाचे कामे कितपत करु शकतो हा देखील प्रश्न होता. तरी देखील पाटील यांनी नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी पदरमोड केली. रविवारी कुणाल पाटील फाऊंडेशनच्या वतीने मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात कार्यकर्ते आणि नागरीकांनी समस्या मांडल्या. त्यानंतर सोमवारी सकाळी केडीएमसीचे अधिकारी संताष ठाकूर, दत्तात्रय मोरे यांच्या सोबत पाटील यानी आडिवली ढोकळी पिसवली या परिसरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली. या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अशी सूचना पाटील यांनी अधिकारी वर्गास केली आहे. अधिकारी वर्गाने पाटील यांच्या सूचना विचारात घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन पाटील यांना दिले आहे.
तसेच गेल्या दहा वर्षांपासून आडिवली परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने आई एकविरा महिला मंडळाने अडीच वर्षांपासून सतत पाठपुरावा केला. अखेर पालिकेने लिहून पाच महिन्यांत रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले. मात्र, मुदत संपून अनेक महिने उलटून गेले तरी रस्ता डांबरीकरणाचा एकही ठोस प्रयत्न दिसत नसल्याचा आरोप महिलांनी केला.
तसेच महापालिकेच्या बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. आरसीसी काँक्रीट रस्ता आणि पेव्हरब्लॉकच्या जॉईंटमधील अंतर वाढल्याने दररोज अपघात होत आहेत, तर अर्ध्या रस्त्यातील पेव्हरब्लॉक जमिनीत रुतले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात शहरातील अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही महापालिका प्रशासन खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहे.