मुंबई : वर्षांनुवर्ष सुरू असलेले महत्वाचे खटले विशिष्ट कालावधीत निकाली काढण्यास ताण येत असल्याचे स्पष्ट करत झवेरी बाजार, दादर आणि ऑपेरा हाऊस येथील २०११ तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याची राज्य सरकारची मागणी विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच या अती महत्वाच्या खटल्यांवर प्रभावी कामकाज आणि ठोस प्रयत्न करण्यास सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही न्यायालयाने सरकारवर केली.
या अती महत्वाच्या खटल्यावर दैनंदिन सुनावणी घेण्याची विनंती करणारा अर्ज सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात केला होता. त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यास नकार दिला.
आधीच्या न्यायाधीशांनीही या खटल्यात जलदगतीने पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यास सांगितले होते. मात्र, तसे असूनही खटला पुढे नेण्यासाठी सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले. तसेच सरकारचा अर्ज पाहता येथे प्रत्येकजण कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात न्यायालयाने खडेबोलही सुनावले आणि अन्य प्रकरणाच्या ताणामुळे महत्वाच्या खटल्यावर दररोज सुनावणी शक्य होणार नाही, असे स्पष्ट करत राज्य सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
अकरा वर्षांपूर्वी १३ जुलै २०११ रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. त्यात २६ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी झाले होते. जानेवारी २०१२ मध्ये एटीएसने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा आणि हारून रशीद नाईक या चार जणांना अटक केली होती. तसेच फरारी आरोपी यासीन भटकळ हा या तिहेरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.