मुंबई : देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी जारी केली असली राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळ लिमिटेडने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कळविले आहे की बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा महाराष्ट्र राज्यातील भूसंपादन पूर्ण झाल्यावर आणि सर्व निविदा/कंत्राट दिल्यानंतर निश्चित केली जाऊ शकते.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळ लिमिटेडकडे विविध माहिती विचारली होती. राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळ लिमिटेडचे उप महाव्यवस्थापक उमेश कुमार गुप्ता यांनी अनिल गलगली यांस कळविले की प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा महाराष्ट्र राज्यातील भूसंपादन पूर्ण झाल्यावर आणि सर्व निविदा/कंत्राट दिल्यानंतर निश्चित केली जाऊ शकते.
गुप्ता यांनी असेही सांगितले की डिसेंबर-२०२० पासून गुजरात आणि दादरा नगर हवेली ( DNH ) मधील संपूर्ण ३२५ किमी लांबीचे नागरी काम वेगवेगळ्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. त्यांनी पुढे कळविले की 1 सप्टेंबर, २०२२ पर्यंत, गुजरात राज्यात नागरी काम पूर्ण गतीने सुरू आहे. संपूर्ण गुजरातमधील सर्व सिव्हिल आणि ट्रॅक टेंडर्स आधीच देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात भूसंपादन सुरू आहे.
अनिल गलगली यांच्या मते संपूर्ण नियोजन न करता जेव्हा असे महत्वाकांक्षी प्रकल्प घोषित केले जातात तेव्हा असे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही आणि कंत्राटादारांस अतिरिक्त रक्कम द्यावी लागते.