टिटवाळा : टिटवाळ्यात एका मंदिरात बुरखाधारी तीन चोरटे हातात धारदार शस्त्रे घेऊन घुसले. मंदिरातील दान पेटी घेऊन हे चोरटे पसार झाले आहेत. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टिटवाळ्यातील श्री शंकर महाराज मंदिरात ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली आणि टिटवाळ्यातील मंदिरांना लक्ष्य केले आहे.
टिटवाळा नजीक म्हस्कळ गाव आहे. या गावात शंकर नाथ सेवा मंदिर गोरखक्षक नाथ आखाडा मंडळ ट्रस्टच्या जागेत श्री शंकर महाराजांचे मुख्य मंदिरासह पाच मंदिरे आहेत. या मंदिरापैकी एक स्वामी समर्थांच्या मंदिरासमोरील एक दान पेेटी अचानक गायब झाली. मंदिरातील सेवाकांनी जेव्हा सीसीटीव्ही तपासले. तेव्हा त्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये तीन तरुण तोंडाला आणि डोक्याला रुमाल बांधून मंदिर परिसरातील दान पेटी चोरी करुन नेत असल्याचे दिसले. सीसीटीव्हीत हे तीन तरुण दिसत आहेत. त्यापैकी एकाच्या हातात धारदार हत्यार आहे.
घटना घडल्यानंतर मंदिर प्रशासनाने कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या चोरट्यांना लवकरच अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्र होते. सुदैवाने मंदिरात कोणी नव्हते. अन्यथा चोरट्यांनी काही ही केले असते. अशी भिती मंदिरीचे सेवक रविंद्र बिरारी यांनी व्यक्त केली आहे. कल्याण डोंंबिवली टिटवाळा परिसरातील चोरट्यांकडून मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. ही बाब या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.