विठ्ठल सुतगिरणीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटला; सूतगिरणीच्या जागेवर बाजार समिती उभारण्याचा मानस
पंढरपूर : कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांनी १९८० साली लावलेल्या विठ्ठल सूतगिरणीच्या रोपट्याची वाढ आता सुरू झाली असून, आमदार अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होणार आहे, असे विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील यांनी सांगितले. यावर अभिजीत पाटील यांनी या ठिकाणी खाजगी बाजार समिती उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
श्री विठ्ठल सूतगिरणीच्या पंढरपूर-कुर्डुवाडी रोडवरील ३४ एकर जागेवर व्यापारी संकुलाचे उद्घाटन ह. भ. प. डॉ. किरण महाराज बोधले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते दोघेही बोलत होते. यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण आबा पवार, मोहन अण्णा कोळेकर, ज्ञानेवर बापू गायकवाड यांच्यासह विठ्ठल कारखान्याचे आजी माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावरील हे चित्र अखंड विठ्ठल परिवाराची ताकद दर्शवणारे होते.
विठ्ठल सुतगिरणी स्थापन करण्याचा निर्णय १९८० साली कर्मवीर औदंबर अण्णा पाटील यांनी घेतला. मात्र, आजतागायत ही सूतगिरणी होऊ शकली नाही. परंतु सभासदांनी विश्वास ठेवल्यामुळेच सूतगिरणीचा निधी जसाच्या तसा राहिला. अभिजीत पाटील यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय झाला. गुढीपाडव्या दिवशी या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन झाले. आता उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, आजी संचालक, विठ्ठल सूतगिरणीचे संचालक आदी सर्व मंडळी व्यासपीठावर आणि व्यासपीठांसमोर उपस्थित होती. हा नेतेमंडळींचा देखावा डोळे विस्फारावे असाच होता.
विठ्ठल सूतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने लवकरच विठ्ठल परिवारातील सर्व मंडळी एकत्र येणार असल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले. यावर बोलताना अभिजीत पाटील यांनी विठ्ठल परिवाराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या आपल्यात काही बोलायचे नाही, समोरच्याला मात्र सोडायचे नाही, अशीच भूमिका आजवर आपण स्वीकारली आहे. माजी संचालक मला ज्येष्ठ आहेत. त्यांनी सांगेल ते ऐकण्याची माझी तयारी आहे, असे सांगून त्यांच्यातील मोठेपणाची झलक दाखवून दिली. यावर माजी संचालक देखील खळखळून हसले.