
तासगावात मतदानाचा घटलेला टक्का कोणाचे गणित बिघडवणार? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार आणि २४ नगरसेवकांसाठी तब्बल ८८ उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा चुरशीची होती. सकाळी साडेसातला मतदानास सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत अवघे १० टक्के मतदान झाले. दुपारी अडीच–तीनच्या सुमारास टक्केवारी जलद वाढत ५४ वर पोहोचली. संध्याकाळी मतदानाची वेळ संपत आली तरी अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा कायम होत्या. ३२,९९४ पैकी २३,२४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग १२ मधील केंद्र क्र. ३ वर सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले, तर प्रभाग ३ मधील केंद्र क्र. ३ अवघ्या ५४ टक्क्यांसह तळाशी राहिले.
प्रतिष्ठेच्या लढतीत कोण जिंकणार?
या निवडणुकीत तासगावातील राजकीय समीकरणे आगळीवेगळी होती. आमदार रोहित पाटील यांची नगरपालिकेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी, तर माजी खासदार संजय पाटील यांची सत्ता टिकवण्यासाठी ही प्रतिष्ठा पणाला लागली. दोघांनीही अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले. या दोघांच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे करून पर्यायाचा दावा मांडला. राष्ट्रवादी अजित पवार गटही निवडणुकीच्या मैदानात उतरला होता.
मतदान घटल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
मतदान कमी झाल्याने दोन्ही प्रमुख गटांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घटलेला मतदानाचा टक्का साधारणपणे ठाम मतदारसंख्या असलेल्या गटाला लाभदायी, तर विस्तृत पण ढिल्या आधाराच्या पक्षाला तोट्याचा ठरतो, असा अनुभव आहे. तथापि, तासगावातील प्रस्थापित नेते, बंडखोरी आणि भाजपाचे स्वतंत्र पॅनेल या तिन्ही गोष्टींमुळे समीकरणे पूर्वीसारखी सरळ न राहता अत्यंत गुंतागुंतीची बनली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निकालापूर्वी कोणाच्या दिशेने जनमत झुकले आहे, हे सांगणे अवघड झाले आहे.
आता डोळे मतमोजणीकडे
मतदानाचा टक्का कमी असला तरी स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. कोणाला जनतेने पसंती दिली आणि कोणाचे गणित चुकले याचा फैसला मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. तासगावची राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहतेय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.