कणकवली : शरद पवार यांचे योगदान नसलं असतं, तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदावर पोहोचूच शकले नसते, असा टोला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या अनधिकृत उत्खनन प्रकरणांवर भाष्य करताना त्यांनी ही टीका केली. कणकवली तालुक्यातील कासारडे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार नाईक यांनी केला. स्थानिक ग्रामस्थांनी यासंबंधी तक्रारी दाखल केल्या असतानाही, संबंधित नागरिकांना उलट धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाईक म्हणाले की, “या परिसरातील सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टर क्षेत्रामध्ये अवैध उत्खनन सुरू असून, महसूल विभागाकडून याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला जातो,” असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. तक्रारीनंतर काही जणांवर दंड आकारण्यात आला असला तरी, तो दंड अद्याप शासनाकडून वसूल करण्यात आलेला नाही. उलट ज्यांच्यावर कारवाई झाली, त्याच लोकांना पुन्हा उत्खननासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.”
“या सगळ्या बेकायदेशीर कारवायांचा आका कोण आहे, हाच प्रश्न आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकाच्या मनात आहे,” असे नाईक यांनी ठासून सांगितले. त्यांनी सांगितले की, लवकरच जिल्हाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व पुरावे सादर केले जाणार आहेत. मात्र, जर वेळेत कारवाई झाली नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. याप्रकरणात महसूल अधिकारीच सामील असल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. “हे अधिकारी स्वतः कोटीच्या हप्त्यांमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे घटनास्थळी जाण्याचे धाडसही ते करत नाहीत. महसूल विभागातील अनेक अधिकारी बेकायदा उत्खनन करणाऱ्यांशी लागेबांधे ठेवून आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
“संजय शिरसाट यांना त्यांच्या मंत्रिमंडळातीलच एका सहकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले की, सत्तेत राहा नाहीतर बाहेर पडा! त्यानंतरही शिरसाट गप्प राहिले. त्यांना ना त्यांच्या खात्याबद्दल स्वाभिमान आहे, ना समाजाबद्दल,” अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार विविध खात्यांमध्ये मनमानी कारभार करत असून, त्यामुळे इतर मंत्र्यांच्या खात्यांवर अन्याय होत असल्याचे आरोपही आमदार नाईक यांनी केले. “बांधकाम, सामाजिक न्याय अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप होत असून, अजित पवार यांच्याविरोधात कोणीही बोलण्याची हिंमत दाखवत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
Pahalgam Terrorist Attack : “तो ISI चा कुत्रा…”; पाकिस्तानच्या Shahid Afridi वर AIMIM चे वारिस पठाण
नाईक म्हणाले, “संजय शिरसाट यांच्यात जर खरा स्वाभिमान असेल, तर त्यांनी आपल्या समाजाला न्याय न दिल्यामुळे तत्काळ राजीनामा द्यावा. ही आमची स्पष्ट मागणी आहे.’लाडकी बहीण’ योजना ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली घोषणा होती आणि “ती निवडणूक संपल्यावर त्याच स्वरूपातच राहिली,” असेही नाईक यांनी सांगितले. “अजित पवार उपमुख्यमंत्री झाले असतेच नाहीत, जर शरद पवार नसते तर!” असा पुनरुच्चार करत नाईक यांनी म्हटले की, “गेल्या वेळी देखील ते उपमुख्यमंत्री झाले नसते, जर त्यांनी शरद पवारांची गद्दारी केली नसती.”
“मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहणाऱ्या अजित पवारांनी हे विसरू नये की, ते मुख्यमंत्री नव्हे, उपमुख्यमंत्रीच का झाले, यामागची कारणं त्यांनी समजून घ्यावीत,” असा टोला त्यांनी लगावला. आमदार नाईक यांनी सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत जनतेला मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, आजतागायत त्यांची पूर्तता झालेली नाही.”