
लग्नाच्या आनंदात काळाचा घाला; पाण्याच्या टाकीत बुडून महिलेचा मृत्यू
गवळी कुटुंबात लग्नाचा आनंद, पाहुण्यांची ये-जा, खरेदीची लगबग सुरू होती. शुक्रवारी घरात ‘सुवासिनींचे जेवण’ आयोजित करण्यात आले होते. स्वयंपाकाच्या तयारीदरम्यान घरात पाण्याची टंचाई जाणवल्याने आशा गवळी या सोसायटीच्या वाहनतळातील जमिनीखालच्या टाकीतून पाणी काढण्यासाठी गेल्या. पाण्याची बादली टाकताना तोल गेल्याने त्या टाकीत पडल्या.
थोड्याच वेळात त्या दिसेनाशा झाल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, टाकीचे झाकण उघडे दिसले. मुलाने आत पाहिले असता आई पाण्यात बुडालेली दिसली. तत्काळ त्यांना बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे लग्नाचे वातावरण शोकाकुल झाले असून, गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.