itendra Awhad's controversial statement
Jitendra Awhad News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा सनातन धर्माबद्दल एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “सनातन धर्म नावाची कोणतीही गोष्ट कधीच नव्हती आणि ही विचारसरणी भारताच्या अधोगतीचे एक प्रमुख कारण राहिली आहे.” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
आव्हाड म्हणाले, ‘सनातन धर्माने भारताला उद्ध्वस्त केलं आहे. सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म कधीच नव्हता. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत. या तथाकथित सनातन धर्मानेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक थांबवला. या सनातन धर्मानेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली.’ इतकेच नव्हे तर ‘या धर्माच्या नावाखाली समाजातील अनेक महान सुधारकांवर अत्याचार करण्यात आले. ‘सनातन धर्माच्या अनुयायांनी माहात्मा ज्योतिराव फुले यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण आणि माती फेकली. हा सनातन धर्म शाहू महाराजांना मारण्याचा कट रचत होता.’ असे धक्कादायक विधानही त्यांनी केलं आहे.
#Bringbackmadhuri:जात-पात-धर्म सोडून माधुरीसाठी कोल्हापुरकर एकवटले; नांदणीतून मोर्चाला सुरूवात
तसेच, डॉ. भीमराव आंबेडकरांचा उल्लेख करत आव्हाड म्हणाले, ‘डॉ. भीमराव आंबेडकरांना शाळेत पाणी पिण्याची आणि अभ्यास करण्याची परवानगीही नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर या सनातन धर्माविरुद्ध आवाज उठवला, मनुस्मृती जाळली आणि त्याच्या दमनकारी परंपरांना नकार दिला. मनुस्मृतीचे लेखकही याच सनातनी परंपरेतून आले आहेत. आजच्या काळात या गोष्टी उघडपणे सांगायला हव्यात. ‘सनातन धर्म आणि त्याची सनातनी विचारसरणी विकृत आहे हे उघडपणे सांगण्यास घाबरू नये.’ असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाडांच्या या विधानानंतर राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानाबाबत सोशल मीडियावर विरोध आणि समर्थनाचे दोन्ही आवाज येत आहेत. आता या विधानावर भाजप आणि संघ परिवाराकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावे लागेल.
मालेगाव स्फोटातील सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता आणि भगव्या दहशतवादावर राजकीय चर्चा सुरू असतानाच आव्हाड यांनी हे विधान केलं आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे एक स्फोट झाला होता. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे १०० हून जण जखमी झाले होते. मालेगाव स्फोट प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. २०११ मध्ये हा खटला एनआयएकडे सोपवण्यात आला होता.
घटस्फोट की खेळ? सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र…इंस्टाग्राम पोस्टने खळबळ
३१ जुलै रोजी महाराष्ट्रातील मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व ७ आरोपींची एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. निकालानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, मी मुख्यमंत्री असता माझ्या कार्यकाळात ‘सनातन’ संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती. या संघटनेवर बंदी घालण्यासाठी मी केंद्रीय गृह मंत्रालयाला एक गोपनीय अहवाल पाठवला होता त्यासंदर्भात माझ्याकडे हजारो पुरावेही जमा झाले होते. त्या संदर्भात मी ‘सनातन’ हा शब्द वापरला होता कारण त्या संघटनेचे काम दहशतवादी स्वरूपाचे होते. या संघटनेवर बंदी घालायला हवी होती.