दुधाला राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघ प्रति लिटर 30 रुपये इतका कमी दर देतात. यामुळे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय परवडत नसल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांनी केले आहे. विविध शेतकरी संघटनांनी देखील यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
काही कृषी तज्ञांनी देखील राज्य शासनाकडे दूध खरेदी दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता दूध खरेदी दरात वाढ व्हावी यासाठी शासन देखील सकारात्मक बनले आहे. दुधाला किमान 35 रुपये प्रति लिटर इतका दर मिळावा यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे चित्र आहे.
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात या विषयावर राज्यातील सर्व दुग्ध सहकारी संस्थांची बैठक घेतली होती. या बैठकीत दुधाला किमान 35 रुपये प्रति लिटर इतका दर मिळाला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावर दुग्ध सहकारी संस्थांशी चर्चा देखील झाली आहे.
35 रुपये प्रति लिटर दर मिळणार
यामुळे आगामी काळात दुधाला किमान 35 रुपये प्रति लिटर इतका दर मिळणार असा आशावाद दुग्ध उत्पादकांना वाटतोय. तसेच, दूध संघांच्या व्यवस्थापनाच्या खर्चाचा ही अभ्यास करून नफ्याचा हिस्सा उत्पादकांना मिळावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तसेच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी दिली. एवढेच नाही तर पाटील यांनी पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश दिल्याचे यावेळी सांगितले.
पशुखाद्याचे दर जवळपास 25% कमी करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. यामुळे साहजिकच पशुपालक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होणार आहे आणि उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळणार आहे.
जनावरांना लसीचा दुसरा डोस मोफत
याशिवाय एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरवला जाणार असून यासाठी शासन दरबारी विचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच लंपी रोगाच्या प्रतिबंधासाठी जनावरांना लसीचा दुसरा डोस देखील मोफत दिला जाणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली आहे.