यंदाही आवाजाची पातळी धोकादायक; खंडोजी बाबा चौकात तब्बल 109 डेसिबलची नोंद, सीओईपीचा अहवाल जाहीर
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत विसर्जनाच्या चोवीस तासातली आवाजाची पातळी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी धोकादायक श्रेणीत मोडली गेली आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत नुकत्याच हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेश आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील ध्वनी पातळी किती आणि कशी असेल याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने जाहीर केलेल्या अहवालानुसार सहा आणि सात सप्टेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावरील दहा महत्त्वाच्या चौकांत मोजमाप केले गेले. सरासरी ९२.६ डेसिबल इतकी भीषण पातळी नोंदवली गेली. खंडोजी बाबा चौकात तर १०९ डेसिबल इतका प्रचंड आवाज नोंदवला गेला. हा स्तर ‘आरोग्याला हानिकारक’ या श्रेणिक मोडतो. अहवालानुसार गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा आवाज किंचित घटला आहे. मात्र ९० डेसिबलच्याही पुढे ही सरासरी पातळी पोहोचते.
गेल्या काही वर्षात कार्यकर्ते आणि भाविक यांच्यात ध्वनी प्रदूषणाबाबतची जागरूकता वाढली आहे. आवाजाच्या पातळी मोजण्याच्या प्रक्रियेबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे डीजे नियंत्रणावर भर दिला असला तरी पारंपारिक ढोल ताशांचा आवाज सुद्धा उच्चतम मर्यादेच्या पलीकडे पोहोचतो, हे या आकड्यांवरून दिसून येते. तज्ञांच्या मते इतक्या उच्च पातळीचा आवाज लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी घातक आहे.
ठिकाणनिहाय पातळी (सरासरी)
करोनापश्चात वाढलेल्या आवाजाच्या पातळीवर नियमांमुळे आणि स्वयंशिस्तीमुळे यावर्षी काहीसा परिणाम जाणवला. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील सर्व चौकांमध्ये विसर्जनाच्या दिवशी २४ तासात आवाजाची पातळी काही प्रमाणात निश्चित खालावली. ही बाब एकंदर ध्वनीप्रदूषणाबाबतच्या जनजागृतीचा एक विधायक परिणाम म्हणता येईल. आम्हा सर्वांना विद्यानिधी गणरायाने अशीच बुद्धी द्यावी ही प्रार्थना.
– डॉ. महेश शिंदीकर, विभाग प्रमुख, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे