श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत आक्रमक होत संभाजी भिडेंवर अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर त्यांना ‘गुरुजींना अटक करण्याची भाषा करता तुम्हाला जगायचे आहे का’? अशा धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पृथ्वीराज चव्हाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. पोलिसांकडून या ई-मेलद्वारे धमकी प्रकरणी सायंकाळपर्यंत कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही धमकी देणारी व्यक्ती नांदेडची असून, पकडली गेली आहे. त्यास ताब्यात घेण्यासाठी कराड शहर पोलिसांचे पथक नांदेडकडे रवाना झाल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले आहे.