
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा, सिंह, माकड दाखल होणार; तिकिट दरात 50 टक्क्यांची वाढ?
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आता आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने तिकिट दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्याबाबतचा विचार सुरू केला आहे. पुढील काळात प्राणीसंग्रहालयात नवीन प्राणी दाखल होणार आहेत त्यामुळे खर्चामध्ये अधिक वाढ होणार आहे. त्यामुळे तिकीटीमध्ये वाढ करावी लागेल असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले होते. परंतु तिकीट वाढीबाबतचा कोणाताही प्रस्ताव अजुन तयार करणात आला नसल्याची माहिती उदयान विभाग प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली. त्यामुळे सध्या तरी तिकीटांमध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, प्राणी संग्रहालयासाठी महापालिकेकडून होणारा खर्च, मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक आहे. प्राण्यांच्या अन्नाचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल आणि विस्तार योजनांवर मोठा निधी खर्च होत आहे, त्यामुळे टिकीट वाढ करणे आवश्यक आहे.
प्राणीसंग्रहालयात लवकरच झेब्रा, माउस डियर, सिंहमाकड, तसेच मर्मोसेट, टॅमरिन आणि जंगली कुत्रे दाखल होणार आहेत. सर्प उद्यानाचे पुनर्विकसनही सुरू आहे. सध्या प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट, सिंह, अस्वल, काळवीट, चितळ, सांबर, चिंकारा, विविध माकडे, सर्प, सरपटणारे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.
आयुक्तांनी सांगितले की, देशातील इतर प्राणीसंग्रहालयांच्या तुलनेत कात्रज प्राणी संग्रहालयाचे तिकिट दर अत्यल्प आहेत. दरामध्ये वाढ झाल्यास महसूल वाढवण्यात आणि प्राणी संग्रहालय आत्मनिर्भर बनवण्यास मदत होणार आहे. तिकीटांमध्ये मागील वाढ नोव्हेंबर 2018 मध्ये झाली होती.
देशातील इतर प्राणीसंग्रहालयांच्या तुलनेत कात्रज प्राणीसंग्रहालयाचे तिकिट दर अत्यल्प आहेत, त्यामुळे टिकीटामध्ये वाढ करण्याबाबत आयुक्तांनी चर्चा केली होती. दर वाढीबाबतचा कोणताही प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही, त्यामुळे सध्या तरी कोणतीही वाढ टिकीटामध्ये झालेली नाही – अशोक घोरपडे, उद्यान विभाग प्रमुख