मुंबई– हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा, या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa 2023). गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक, असे मानले जाते. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यानुसार, काहीजण या दिवशी सोनं (Gold) खरेदी करतात, काही नवीन कार (Car) घेतात तर काही जण नवीन व्यवसायाला प्राधान्य देतात. तर काहीजण नवीन घरात प्रवेश करतात. तसेच राज्यात आज मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेलं आहे.
शोभायात्रानं नव वर्षाचं स्वागत…
दरम्यान, आज गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढून नव्या वर्षाच्या स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्यात विविध ठिकाणी म्हणजे मुंबई, गिरगाव, लालबाग, दादर, ताडदेव, कल्याण, डोबिंवली, कोल्हापूर, पुणे, सातारा तसेच राज्यातील आदी भागात शोभा यात्रा काढून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. या शोभायात्रेमध्ये प्रत्येकजण आनंदाने, अभिमानाने सहभागी होतायत. यासोबतच अनेक सेलिब्रेटीही या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.
डोंबिवलीत शोभायात्रेत मुख्यमंत्री सहभागी होणार
मुख्यमंत्री सकाळी 9.30 च्या सुमारास थेट स्वागतयात्रेत पायी चालत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे, डोंबिवली हा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ आहे. राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली शहरात भव्य नववर्ष स्वागतयात्रा निघत आहे. त्यामुळं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.