पुणे महापालिका(फोटो-सोशल मीडिया)
पुणे : शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत राजकीय फ्लेक्सच्या विळख्यातून पुणे महापालिकेने आता कडक भूमिका घेतली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन दिवसांत तीव्र कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर आता दंडासह गुन्हा दाखल होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी शहरभर उभारलेले पोस्टर, बॅनर, शुभेच्छा फ्लेक्स, कार्यक्रम जाहिराती यांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात होती.
महापालिकेने काही दिवसांपूर्वीच राजकीय पक्षांना आणि संभाव्य उमेदवारांना अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत, तसेच आधी लावलेले फ्लेक्स तातडीने हटवावेत अशी विनंती केली होती. मात्र यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा दिसून न आल्याने अखेर आयुक्तांनी कठोर निर्णय घेत कारवाईचे आदेश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचा अनधिकृत फ्लेक्स, बॅनर किंवा होर्डिंग शहरात सहन केले जाणार नाही. राजकीय असो वा गैर-राजकीय, परवानगीशिवाय लावलेला कोणताही फ्लेक्स तत्काळ हटवला जाईल आणि संबंधित व्यक्तीविरुद्ध १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.
याचबरोबर, अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे निवडणूक काळातील अवैध जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाच्या पथकांना, क्षेत्रीय कार्यालयांना आणि संबंधित विभागांना ४८ तासांत मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, शहरातील प्रमुख चौक, रस्ते, उड्डाणपूल, सार्वजनिक इमारती आणि खासगी जागांवरील अनधिकृत फ्लेक्स हटवण्याचे काम तातडीने सुरू होणार आहे.
दरम्यान, काही प्रभागांमध्ये मध्यरात्रीपासूनच अनधिकृत फ्लेक्स काढण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे समजते. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फ्लेक्स, जन्मदिवस पोस्टर्स आणि राजकीय बॅनर लावलेले आढळून आले. निवडणुकीचे वातावरण तापत असताना उमेदवारांकडून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या जाहिरातींना उधाण येते. मात्र या गर्दीमुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून, वाहतुकीतही अडथळे निर्माण होत असल्याचा अनुभव नागरिकाला दररोज येत आहे.
हेही वाचा : IND vs SA T20I series : अभिषेक शर्मासोबत सलामीला कोण उतरणार? कर्णधार सूर्याने थेट नावच सांगून टाकले….
महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर राजकीय फ्लेक्स लावणारे स्वतःहून फ्लेक्स हटवतील तर दंडाची कारवाई टाळता येऊ शकते. पण फ्लेक्स जागेवर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात कोणतीही सुट दिली जाणार नाही. काही पक्ष नेत्यांनी मात्र प्रशासनाच्या अचानक वाढलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून, निवडणूक प्रचाराच्या तयारीला अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. मात्र शहरातील शिस्त आणि सौंदर्य जपण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
निवडणुकीच्या दिशेने शहराची पावले वेगाने चालली असतानाच महापालिकेची ही अचानक कडक कारवाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील दोन दिवसांत शहरातील मोठा भाग अनधिकृत फ्लेक्सपासून मुक्त होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.






